चामोर्शी येथील समाज कल्याण विभागाच्या वस्तीगृहाचे लोकार्पण करा

136

– आमदार डॉ. देवरावजी होळी यांची सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे मागणी

– विद्यार्थ्यांच्या समस्या सोबतच जिल्ह्यातील समस्यांबाबतही केली मंत्री महोदयांशी चर्चा

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : चामोर्शी येथे मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या सोयी सुविधेसाठी वस्तीगृह मंजूर करण्यात यावा याकरिता आपण सातत्यपूर्ण पाठपुरावा केल्याने राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस, वित्तमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार व सामाजिक न्याय मंत्री राजकुमारजी बडोले यांनी चामोर्शी येथे मागासवर्गीय मुलांसाठी वस्तीगृह मंजूर केले व त्याचे बांधकामही पूर्ण झाले. परंतु या सरकारने अजूनपर्यंत या वसतिगृहाचे लोकार्पण केले नाही. त्यामुळे आपण स्वतः चामोर्शीला दौरा नियोजित करून या वसतिगृहाचे लोकार्पण करावेत, अशी मागणी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजयजी मुंडे यांच्याकडे मुंबई मंत्रालयात भेट घेऊन केली.

चामोर्शी तालुक्यातील आजूबाजूच्या परिसरातील अनेक विद्यार्थ्यांना राहण्याची सोय नसल्याने आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी सामाजिक न्याय विभागाच्या वतीने वस्तीगृहाचे बांधकाम करण्यात यावे, अशी मागणी तत्कालीन भाजपा सरकारकडे केली होती. त्यानुसार तत्कालीन मुख्यमंत्री, वित्तमंत्री व सामाजिक न्याय मंत्र्यांनी आपली मागणी मान्य करीत त्या ठिकाणी वस्तीगृह उभारण्यास मंजुरी दिली. आज वस्तीगृहाचे काम पूर्ण झालेले आहे. परंतु राज्यात सत्तेत आलेल्या महाविकास आघाडी सरकारच्या अनास्थेमुळे सदर कामाचे अजूनपर्यंत लोकार्पण झालेले नाही. त्यामुळे मंत्री ना. धनंजयजी मुंडे यांची भेट घेऊन सदर काम लवकरात लवकर करावे, अशी मागणी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी केली.