खदानविरोधी आंदोलन बदनाम करण्याचा डाव : जनतेने एकजुटीने लढण्याचे आवाहन

108

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : बेकायदेशीर सुरजागड लोह खाणीच्या विरोधात सुरजागड पारंपारिक इलाखा गोटूल समिती आणि जिल्ह्यातील गाव गणराज्याच्या ग्रामसभांच्या वतीने सुरू असलेल्या खदान विरोधी आंदोलनाला काही लोकांनी द्वेषभावनेतून आणि राजकीय हेतूने प्रेरित होऊन सोशल मीडियावर बदनाम करण्याचे काम केले असून जनतेने एकजूटीने सदरचा डाव हाणून पाडण्यासाठी खदानविरोधी आंदोलन एकजुटीने पुढे रेटावे, असे आवाहन सुरजागड पारंपारिक इलाखा गोटूल समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

मागील काही दिवसांपासून फेसबुक, वाॅट्सअप सारख्या सोशल मीडियावर सुरजागड लोह खाणविरोधी आंदोलन आणि आंदोलनाच्या नेत्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न होत असल्याच्या पार्श्वभूमीवर सुरजागड पारंपारिक इलाखा गोटूल समितीच्या वतीने प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सुरजागडच नव्हे तर जिल्ह्यातील २५ जनविरोधी लोह खाणी कायमस्वरूपी रद्द करा या मागणीसाठी जिल्हाभरातील शेकडो ग्रामसभांच्या वतीने खदान विरोधी आंदोलन करण्यात येत आहे. सदर आंदोलन कोणा एका नेत्यांमुळे सुरू नसून जनतेनी ग्रामसभांमध्ये ठराव करून आणि लेखी निवेदन, तक्रारींच्या माध्यमातून तसेच धरणे, मोर्चाच्या माध्यमातून प्रखर पध्दतीने विरोध केला जात आहे. मात्र भांडवलदारांच्या आणि दलाल लोकप्रतिनिधी, सत्ताधारी आणि अधिकाऱ्यांच्या संगनमताने बळजबरीने सुरजागड येथे खाणकाम करण्यात येत आहे.

या बेकायदा कामात अडथळा निर्माण होवून कामबंद होवू नये यासाठी कंपनीचे दलाल वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवून आंदोलनाच्या स्थानिक नेत्यांना पैसे घेऊन ‘मॅनेज’ झाल्याच्या चर्चा पेरुन बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहेत.

न्यायालयीन लढाईसाठी नुकताच सैनू गोटा, ॲड. लालसू नोगोटी आणि सहकाऱ्यांचे एक शिष्टमंडळ दिल्लीतील एका ज्येष्ठ वकिलांची भेट घेऊन आल्याने तसेच शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलनाच्या परवानगी करीता अपीलात गेल्याने भांबावलेल्या दलाल आणि लोह तस्करांनी सध्या बदनामीचे कारस्थान रचले आहे. या कारस्थानाला बळी न पडता गाव गणराज्याच्या ग्रामसभांच्या जनतेने खदान विरोधी संघर्ष पुढे रेटण्यासाठी आपली एकजूट कायम ठेवावी, असे आवाहन सुरजागड पारंपारिक इलाखा गोटूल समितीचे प्रमुख सैनू गोटा, ॲड.लालसू नोगोटी, शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई रामदास जराते, जयश्री वेळदा, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव काॅ. अमोल मारकवार यांनी केले आहे.