जनतेचे हित लक्षात घेऊन अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काम करावे : आमदार डॉ. देवरावजी होळी

111

– आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली गडचिरोली पंचायत समितीची वार्षिक आमसभा

– जिल्हा परिषद शाळा गडचिरोली येथे आयोजित वार्षिक आमसभेत आमदार महोदयांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर

– वार्षिक आमसभेला अनुपस्थित राहणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांवर होणार कारवाई

– उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा व प्रतिनिधींचा सत्कार

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : लहान लहान कामासाठी आलेल्या ग्रामीण भागातील लोकांना नाहक त्रास न देता त्यांच्याशी प्रेमाने व सहकार्याने वागून त्यांच्या हितासाठी प्रथम प्राधान्य देऊन काम करावे, असे निर्देश गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी गडचिरोली येथे आयोजित पंचायत समितीच्या आढावा सभेमध्ये उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिले.
यावेळी मंचावर पंचायत समितीचे माजी उपसभापती विलासजी दशमुखे, संवर्ग विकास अधिकारी मोहर, पंचायत समिती माजी सदस्य तथा भाजपा तालुका अध्यक्ष रामरतन गोहणे, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य साखरे, माजी पंचायत समिती सदस्य गावतुरे, तालुका महामंत्री हेमंत बोरकुटे प्रामुख्याने उपस्थित होते.

आमसभेच्या सुरुवातीला शिक्षण, आरोग्य, कृषी, एम.आर.ई.जी.एस. इत्यादी विभागांतर्गत चांगले काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा व प्रतिनिधींचा सत्कार आमदार डॉ. देवरावजी होळी व मंचावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

आमसभेमध्ये अनेक स्थानिक प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. अनेक विषयांवर वादळी चर्चा झाली. एम. एस. ई. बी. ला सन २०१८ पासून शेतकऱ्यांनी डिमांड भरूनही त्यांना अजून पर्यंत कृषी पंपाचे कनेक्शन वीजपुरवठा करण्यात आलेला नाही. तालुक्यातील अनेकांचे वनहक्काचे पट्टे प्रलंबित असून त्याचाही निर्णय अजून पर्यंत झालेला नाही. घरकुल मंजूरी बाबत असलेल्या अडचणी, घरकूल मंजूर झाल्यावर रद्द होणे यासारख्या समस्यांमुळे स्थानिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला असून राज्य शासनाविषयी प्रचंड चीड निर्माण झाली असल्याचे या सभेदरम्यान दिसून आले. तसेच अनेक विकास कामामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराचे प्रकरणं लक्षात आल्याने त्यांच्या चौकशीचे आदेशही यावेळी देण्यात आले. पंचायत, कृषी, बांधकाम, रस्ते विकास एम. एस. ई. .बी. इत्यादी विषयांवर सभेत चर्चा करण्यात आली.
अधिकाऱ्यांनी तातडीने अशा समस्यांकडे लक्ष देऊन सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी सहकार्याने काम करावे. स्थानिक लोकांना अकारण कार्यालयात फेऱ्या मारण्यास भाग पाडू नये, त्यांना अकारण त्रास देऊ नये, असे निर्देश त्यांनी या सभेच्या दरम्यान उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिले. या सभेला अधिकारी, कर्मचारी, लोकप्रिनिधीनी यांच्यासह स्थानिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शविली.