नागरिकांनी आयुष्यमान भारत योजनेचा लाभ घ्यावा : खा. अशोक नेते

95

– देसाईगंज ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गरीब नागरिकांना आरोग्य सेवेचा लाभ घेता यावा व त्यांना उपचार व शस्त्रक्रिया मोफत मिळाव्यात या उदात्त हेतूने देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांनी नव्याने आयुष्यमान भारत योजना अंमलात आणली आहे. या योजने अंतर्गत गरीब कुटुंबातील नागरिकांचे 5 लाखापर्यन्तचे उपचार मोफत केल्या जाणार आहे . तरी सर्व सर्वसामान्य, गरीब नागरिकांनी या मोफत आरोग्य योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन खासदार अशोक नेते यांनी केले. देसाईगंज येथील आरोग्य मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त देसाईगंज येथे आयुष्यमान भारत डिजिटल मिशन अंतर्गत भव्य आरोग्य मेळाव्याचे व तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्याचे उद्घाटन खासदार अशोक नेते यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून आरमोरी विधानसभाचे आमदार कृष्णाजी गजभे, भाजपचे जिल्हाध्यक्ष किसनजी नागदेवे, वडसाच्या नगराध्यक्ष शालुताई दंडवते, माजी नप उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा, तालुका अध्यक्ष राजूभाऊ जेठानी, भाजपचे सुनील पारधी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिषेक कुंभरे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अविनाश मिसार, डॉ. बन्सोड, डॉ. गहाणे, डॉ. स्नेहा कापगते, भाजपचे दत्तूभाऊ माकोडे व अन्य आरोग्य अधिकारी उपस्थित होते.
आरोग्य तपासणी मेळाव्यात शेकडो लोकांनी आपल्या आरोग्याची तपासणी केली. कार्यक्रमाला आरोग्य कर्मचारी, अधिपरीचरिका, मोठ्या संख्येने उपस्थित होते.