पोटेगाव आश्रमशाळेत दहावीच्या विद्यार्थ्यांना दिले गुरुमंत्र

200

– लेखनसाहित्य देऊन सन्मान : गोंडी गीतातून प्रोत्साहन

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली अंतर्गत तालुक्यातील शासकीय माध्यमिक आश्रमशाळा पोटेगाव येथे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेला प्रविष्ट होणाऱ्या दहावीच्या विद्यार्थांना परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले.
गुरुवारी पार पडलेल्या कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक मंगेश ब्राह्मणकर होते.
कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून जेष्ठ माध्यमिक शिक्षक सुधीर शेंडे, डॉ. एस. डी गोट्टमवार, प्रमिला दहागावकर, के. पी. मेश्राम, पदवीधर प्राथमिक शिक्षिका मीनल शेट्टीवार, प्राथमिक शिक्षक व्ही. एस. कापसे, व्ही. एस. देसू, व्ही. एम. नैताम, एन. पी. नेवारे, जयश्री रामगीरवार, प्रतिभा गोवर्धन, अधिक्षक एस. आर.जाधव, अधिक्षिका एल. आर. शंभरकर, क्रीडा शिक्षिका प्रीती क्षिरसागर, कला शिक्षक प्रमोद पवार, संगणक शिक्षक रजत बारई आदी उपस्थित होते.
यावेळी शिक्षकांनी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेला समोर जातांना करावयाच्या तयारीबद्दल विस्तृत मार्गदर्शन केले. आपले जीवन म्हणजे शरीर, बुद्धी व मन या तीन घटकांचे त्रिवेणी संगम होय. या तीनही घटकांची क्षमता वाढविण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपाय योजनांची माहिती देण्यात आली.जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रबळ इच्छाशक्ती व सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करावे. आपले ध्येय निश्चित करून आत्मविश्वासाने व तनावमुक्त वातावरणात परीक्षेला समोर जाऊन आपले भवितव्य घडवावे असे आवाहन करण्यात आले.
दहावीच्या विद्यार्थ्यांना लेखनसाहित्य भेटवस्तू देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.दहावीचे विद्यार्थी भास्कर नरोटे, आशिष पोटावी, पूजा उसेंडी, अनिता नरोटे, क्रिष्टी एक्का, पल्लवी मट्टामी, करिश्मा आतला आदीने शाळेतील अनुभव व मनोगत व्यक्त केले.
इयत्ता नववीच्या विद्यार्थिनी वनश्री कुमरे, शिवाणी पोटावी, आरती पुडो, करीना नरोटे यांनी गोंडी भाषेतील सामूहिक गीतातून दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी प्रोत्साहन दिले.
प्रास्ताविक ज्येष्ठ माध्यमिक शिक्षक सुधीर शेंडे यांनी केले. संचालन नववीची विद्यार्थिनी वनश्री कुमरे तर आभार प्रदर्शन शिवाणी पोटावी हिने केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी व्ही. के. नैताम, विनोद बेहरे, प्रशांत बोधे, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.