संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात कृषी पंपांना मुबलक विज देणार

76

– आमदार गजबेंच्या पाठपुराव्यास ऊर्जामंत्र्यांचे सकारात्मक उत्तर

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : उन्हाळी धान फसलीच्या गंभीर मुद्द्याला हात घालुन जिल्ह्यात सुरळीत विज पुरवठा करण्यात यावा या मागणीला घेऊन सातत्याने केलेल्या पाठपुराव्यास अखेर यश आले असुन संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यात कृषी पंपाना मुबलक वीज देण्यात येणार असल्याचे सकारात्मक उत्तर राज्याचे ऊर्जामंञी डाॅ. नितीन राऊत यांनी दिला असल्याने एकुणच आमदार कृष्णाजी गजबे यांच्या पाठपुराव्याचे हे मोठे फलित असल्याचे बोलल्या जाऊ लागले आहे.
आरमोरी मतदारसंघासह संपूर्ण गडचिरोली जिल्हा हा आदिवासी दुर्गम व नक्षलग्रस्त असून याठिकाणी कोणतेही मोठे उद्योग व्यवसाय नसुन संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यातील नागरिक केवळ शेती व्यवसायावर अवलंबून आहेत. त्यातही प्रामुख्याने धान पिकाचे उत्पादन घेतल्या जाते व धान पिकाला सिंचनासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यक असते.
जिल्ह्यात पुरेसे पाणी उपलब्ध असुनही विजेअभावी शेतकऱ्यांना पिकाचे सिंचन करता येत नाही. त्यामुळे त्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होत असल्याचे निदर्शनास येताच आमदार कृष्णा गजबे यांनी राज्याचे ऊर्जामंत्री यांना निवेदन देवून गडचिरोली जिल्ह्यात कृषी पंपांना २४ तास विज पुरवठा करण्याची मागणी केली होती. सदर मागणीला यश येत नसल्याचे पाहुन त्यांनी वेळोवेळी शेतकऱ्यांना सोबत घेऊन आंदोलन केले व स्वत:ला अटक सुद्धा करवून घेतली होती. माञ समस्येचे निराकरण न झाल्याने मुंबई येथे सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात तारांकीत प्रश्न,उर्जा विभागाच्या चर्चेत सहभागी होऊन वारंवार गडचिरोली जिल्ह्यात कृषी पंपांना २४ तास विज पुरवठा करण्याची शासनाकडे मागणी सुरुच ठेवली.
त्याच पाठपुराव्यात १० मार्च २०२२ रोजी संसदीय आयुधातील सर्वात मोठे आयुध असलेल्या अर्धा तास चर्चेच्या माध्यमातून सभागृहात चर्चा घडवून आणली. सदर विषयावर चर्चे दरम्यान राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी उत्तर देताना दालनात बैठक घेऊन समस्येचे निराकरण करण्याचे आश्वासन दिले.सदर आश्वासनानुसार विधानभवन मुंबई येथे राज्याचे ऊर्जामंत्री यांच्या दालनात बैठक होऊन बैठकीत ऊर्जामंत्री यांनी गडचिरोली जिल्ह्याची सामाजिक, आर्थिक व मानव निर्देशांकाबाबत एकंदर परिस्थिती बघता विजे अभावी शेतकऱ्यांना नापिकीमुळे नुकसान सहन करावे लागु नये, यासाठी सकारात्मक भूूमिका घेत उपस्थित अधिका-यांना गडचिरोली जिल्ह्यातील कृषी पंपांना मुबलक विज पुरवठा करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे येत्या काळात गडचिरोली जिल्ह्यात कृषी पंपांना मुबलक विज पुरवठा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
या बैठकीत आमदार कृष्णा गजबे यांच्यासह आमदार डॉ. देवराव होळी, प्रधान सचिव ऊर्जा विभाग दिनेश वाघमारे, महावितरणचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल व अन्य उच्च पदस्थ अधिकारी उपस्थित होते.