विज्ञानाच्या तत्वांचा सखोल अभ्यास करून त्यांचा दैनंदिन जीवनात वापर करावा : जिल्हाधिकारी संजय मीणा

79

– रामनगर येथील जवाहरलाल नेहरु नगर परिषद शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विद्यार्थ्यांमधील विज्ञान विषयक सुप्त गुणांना वाव मिळावा आणि व्यासपीठ उपलब्ध व्हावे यादृष्टीने जवाहरलाल नेहरू न. प. उच्च प्राथमिक शाळा रामनगर (गडचिरोली) येथे 28 फेब्रुवारी रोजी विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले. विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन जिल्हाधिकारी संजय मीणा यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा नगर परिषद गडचिरोलीचे प्रशासक आशिष येरेकर, नगर परिषद गडचिरोलीचे मुख्याधिकारी विशाल वाघ हे उपस्थित होते. जिल्हाधिकारी यांनी सहभागी विद्यार्थ्यांकडून सादर केलेल्या प्रयोगाची माहिती जाणून घेतली व सोबतच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सोबतच मानवी आंतर इंद्रीयांच्या विद्यार्थी व शिक्षकांनी काढलेल्या रांगोळ्या, सायन्स वाल याचे अवलोकन केले. विज्ञान प्रदर्शनात नगर परिषदेच्या रामपूर, लांजेडा, इंदिरा गांधी, शिवाजी शाळा येथील विद्यार्थी सहभागी झाले. या प्रदर्शनात एकुण 75 विज्ञान प्रतिकृती सादर करण्यात आल्या. सोबतच वैज्ञानिकांचे जीवन परिचय प्रदर्शन, विज्ञान प्रेक्षागृहात वैज्ञानिकांच्या जीवनावर आधारित चित्रपट विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले. याव्यतिरिक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर न. प. उच्च प्राथमिक शाळा संकुल येथे सुध्दा सहाय्यक जिल्हाधिकारी तथा नगर परिषद गडचिरोलीचे प्रशासक आशिष येरेकर यांच्या हस्ते विज्ञान प्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात आले. या ठिकाणी विसापूर, गोकुळनगर, राजीव गांधी, महात्मा गांधी या शाळेचे विद्यार्थी सहभागी झाले. एकूूण नगर परिषद शाळांमधील 1700 विद्यार्थी सहभागी झाले. या विज्ञान प्रदर्शनाला गडचिरोली शहरातील नागरिकांनी भेट देऊन उत्स्फूर्त सहभाग नोंदवला व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याधिकारी विशाल वाघ यांच्या मार्गदर्शनात शिक्षण विभाग प्रमुख बंडू ताकसांडे, केंद्र प्रमुख तथा मुख्याध्यापक सुधीर गोहणे, इतर शाळांचे मुख्याध्यापक कांतीलाल साखरे, रवी उईके, उत्तम पटले, राजेश दरेकर, मंगला मेश्राम, सुमित्रा काळे, प्रतीभा साळवे, नयना चन्नावार, माधुरी म्हस्के, जवाहरलाल नेहरु शाळा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर शाळा संकुलचे शिक्षक, इतर नगर परिषद शाळांचे सर्व शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, पालक यांनी सहकार्य केले.