मार्कंडा देवस्थान यात्रेला परवानगी रद्द केल्याच्या निषेधार्थ आमदार डॉ. देवरावजी होळी यांचे आंदोलन

113

– मार्कंडा देवस्थानाच्या प्रवेशद्वारावरच भाविक व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये सरकारचा केला तीव्र निषेध

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील मार्कंडादेव व चपराळा देवस्थान येथे महाशिवरात्रीनिमित्त भरणाऱ्या यात्रेला परवा अचानक मनाई आदेश काढल्याने या आदेशाच्या विरोधात व यात्रेला तातडीने परवानगी देण्याचा आदेश काढण्यात यावा याकरिता आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या नेतृत्वात मार्कंडा देवस्थानाच्या प्रवेशद्वारावर भाविक व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत भव्य आंदोलन करण्यात आले.

मागील दोन वर्षांंपासून यात्रा भरण्यास बंदी असताना यावर्षी प्रशासनाने यात्रेला परवानगी दिली होती. त्यामुळे जिल्ह्यातीलच नव्हे तर विदर्भातील भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. यात्रेच्या निमित्ताने अनेकांनी त्या ठिकाणी तयारीही केली होती. परंतु परवा अचानक या यात्रांना मनाई आदेश काढण्यात आल्याने भाविकांमध्ये प्रचंड असंतोषाचे वातावरण निर्माण झाले. सदर मनाई आदेश रद्द करून पुन्हा परवानगी देण्यात यावी याकरिता आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या नेतृत्वात मार्कंडा देवस्थान येथे भव्य आंदोलन करण्यात आले. शासनाने तातडीने या यात्रांना परवानगी द्यावी, अशी मागणी या आंदोलनाच्या वेळी आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी शासनाला केली असून त्याबाबतचे पत्रही त्यांनी मा. मुख्यमंत्री व पालकमंत्री यांना पाठवलेले आहेत.