आदिवासींचे दमन खनिज संपत्ती लुटण्यासाठी : सैनू गोटा

129

– धोडराज ठिय्या आंदोलनाला सुरजागड इलाख्याचे समर्थन

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : अनुसूचित क्षेत्रातील खनिज संपत्तींवर देशातील बड्या भांडवलदारांची वाईट नजर पडलेली असून जल, जंगल, जमीन आणि संसाधनाच्या मालकी हक्कांपासून हुसकावून लावण्यासाठी आदिवासींवर पोलिस बळाच्या जोरावर दमन करण्यात येत असल्याची टीका सुरजागड पारंपारिक इलाखा गोटूल समितीचे प्रमुख जि. प. सदस्य सैनू गोटा यांनी केली.

भामरागड इलाख्यातील नेलगुंडा परिसरातील आदिवासी महिलांच्या मोठ्या सहभागाने धोडराज पोलिस मदत केंद्रासमोर रस्त्यावरच मांडलेल्या बेमुदत ठिय्या आंदोलनाला सुरजागड पारंपरिक इलाखा गोटूल समितीच्या वतीने काल जिल्हा परिषद सदस्य सैनू गोटा यांनी आपल्या सहकाऱ्यांसह समर्थन जाहीर केले.

यावेळी ते पुढे म्हणाले की, बस्तरसह गडचिरोली जिल्हाही या दुष्टचक्रात सापडलेला असून आमच्या हजारो पिढ्यांनी जपलेली साधनसंपत्ती सरकारच भांडवलदारांच्या घशात घालायाला निघाले आहे. या विरोधात आवाज उठविणाऱ्या आदिवासी लोकांना नक्षलवादी ठरवून ठार मारण्याचा आणि जेलात टाकण्याचा सपाटा सुरू करुन संविधानिक हक्कांची पायमल्ली केली आहे. त्यामुळे हक्क आणि अधिकारांसाठी निरंतर संघर्ष सुरू ठेवण्याचे आवाहनही सैनू गोटा यांनी केले.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य ॲड. लालसू नरोटे, पंचायत समिती सभापती गोई कोडापे, सुकराम मडावी, पं. स. सदस्य प्रेमिला कुड्यामी, कोठीच्या सरपंच भाग्यश्री लेखामी, मंगेश नरोटे प्रामुख्याने उपस्थित होते.