बंगाली प्राथमिक शिक्षक समितीच्या समस्या तातडीने सोडवा : आमदार डॉ. देवरावजी होळी

102

– महाराष्ट्र राज्य बंगाली प्राथमिक शिक्षक समितीच्या पदाधिकाऱ्यांचे आमदार डॉ. देवरावजी होळी यांना निवेदन

– समस्या निवारणार्थ मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली यांच्याकडे २१ फेब्रुवारीला सायं. ५ वाजता बैठकीचे आयोजन

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली जिल्हा परिषद अंतर्गत पंचायत समितीच्या चामोर्शी व मुलचेरा येथे बांगला माध्यमाच्या एकूण 47 शाळा असून त्याबाबत अनेक समस्या आहेत. त्या समस्या निवारण्यासाठी प्रशासनाने तातडीने प्रयत्न करावे, अशी मागणी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ  देवरावजी होळी यांनी केली आहे.

याबाबत महाराष्ट्र राज्य बंगाली प्राथमिक शिक्षक समितीच्या पदाधिकार्‍यांनी आमदार डॉ. देवरावजी होळी यांची भेट घेऊन त्याबाबतचे निवेदन दिले. जिल्ह्यातील चामोर्शी व मुलचेरा तालुक्यात मोठ्या प्रमाणात बंगाली बांधवांचे वास्तव्य असून या भागात एकूण ४७ बांगला भाषिक शाळा आहेत. या बांगला भाषिक शाळांमध्ये शाळांमधील असलेली रिक्त पदे भरण्यात यावी, इयत्ता पहिली ते पाचवी साठी पदे भरतांना बांगला भाषिक उमेदवारांना प्रथम प्राधान्य देण्यात यावे, शिक्षक पात्रता परीक्षेतील पात्र उमेदवारांना भरतीमध्ये प्राधान्य देण्यात यावे, शासनाकडून बांगला भाषेत शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून द्यावे अशा मागण्या संदर्भात बैठकीचे आयोजन करावे याकरिता आमदार महोद्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याशी चर्चा केली असता सोमवार, २१ फेब्रुवारी २०२२ रोजी सायं. ५ वा. बैठक जिल्हा परिषद गडचिरोली येथे निश्चित करण्यात आली आहे.