फुटपाथ धारकांना तात्पुरता दिलासा : प्रशासनाशी चर्चा होईपर्यंत अतिक्रमण हटाव मोहिम स्थगित

119

– शेतकरी कामगार पक्षाच्या मोर्चाला यश

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली हा उद्योग विरहित जिल्हा असून पोटभरण्याच्या उद्देशाने खेड्यातील गरीब लोकांनी गडचिरोली शहरात फुटपाथवर दुकाने सुरू केलेली आहेत. ही फुटपाथ दुकाने अत्यंत बळजबरीने आणि एकतर्फी, द्वेषभावनेतून करण्यात येत असून पर्यायी व्यवस्था होईपर्यंत सदर कारवाई थांबविण्यात यावी यासाठी शेतकरी कामगार पक्षातर्फे नगर परिषदेवर मोर्चा काढण्यात आला होता. त्यानंतर आज फुटपाथधारक चर्चा करण्यासाठी नगर परिषद कार्यालयात गेले असता सदर हटाव कारवाई नगर परिषद प्रशासनाशी चर्चा होईपर्यंत स्थगित करण्यात येत असल्याचे जाहीर करण्यात आल्याने तात्पुरती दिलासा मिळाला आहे.

शेतकरी कामगार पक्षाने नगर परिषदेवर काल गेलेल्या मोर्चेकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर रात्री १२.३० वाजतापर्यंत फुटपाथ धारकांसह शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई रामदास जराते, शामसुंदर उराडे, देवेंद्र चिमनकर, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव काॅ. अमोल मारकवार, निखिल धार्मिक, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षाचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड, मिलींद बांबोडे, विवेकराजे बारसिंगे यांच्यासह फुटपाथधारकांनी पोलिस ठाण्यातच ठिय्या मांडला होता.

आज सकाळी १० वाजता दरम्यान शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई रामदास जराते, शामसुंदर उराडे, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्षाचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड, मिलींद बांबोडे, विवेक बारसिंगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वासेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष विजय गोरडवार, काँँग्रेसचे शहर अध्यक्ष सतिश विधाते यांच्या उपस्थितीत शेकडो फुटपाथ धारकांनी नगर परिषद कार्यालय गाठले असता नगर परिषद प्रशासन सोमवारी दुपारनंतर फुटपाथ धारक आणि सर्वपक्षीय शिष्टमंडळाशी चर्चा करण्यास तयार असून चर्चा होईपर्यंत अतिक्रमण हटाव मोहिम स्थगित करण्यात येत असल्याचे पोलीस विभागाच्या समक्ष जाहीर केले. त्यामुळे गडचिरोली शहरातील फुटपाथधारक दुकानदारांना तात्पुरती दिलासा मिळाला आहे.

नगर परिषद गडचिरोलीने कारगील चौकात बांधलेले १०० दुकानगाळे शहरातील फुटपाथ धारकांना ‘ड्रा’ पध्दतीने देण्यात यावेत. यात १०% गाळे नक्षलपीडित कुटुंबीय फुटपाथ धारकांना देण्यात यावेत. गडचिरोली जिल्ह्यात कोणताही मोठा उद्योग नसल्याने शहरातील अतिक्रमण धारक फुटपाथ धारकांना पर्यायी जागेची व्यवस्था करुन उपजिविकेची हमी देण्यात यावी. गडचिरोली शहरातील चारही प्रमुख महामार्गावर सर्वीस रोड तयार करण्यात यावा या प्रमुख मागण्यांच्या संबंधाने सोमवारी दुपारनंतर चर्चा होणार आहे.