अतिक्रमण हटावच्या नावाखाली गरिबांवरचा अन्याय थांबवा : शेतकरी कामगार पक्षाची नगरविकास मंत्र्यांकडे मागणी

70

– उद्या नगर परिषदेवर अन्यायग्रस्त फुटपाथधारकांचा काढणार मोर्चा

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : जिल्हा उद्योग विरहित असून पोट भरण्याच्या उद्देशाने खेड्यातील गरीब लोकांनी गडचिरोली शहरात फुटपाथवर दुकाने सुरू केलेली आहेत. त्यांची कोणतीही पर्यायी व्यवस्था न करताच राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामाच्या नावाने अन्यायपूर्ण कारवाई करुन उपासमारीच्या खाईत लोटण्याचे काम केले जात असून सदरची कारवाई तातडीने थांबविण्यात यावी, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई रामदास जराते यांनी राज्याचे नगरविकास मंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

शेतकरी कामगार पक्षाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, आज सकाळपासून अचानकपणे राष्ट्रीय महामार्ग विभाग, नगर परिषद आणि पोलिस विभागाने संयुक्त कारवाई करीत अतिक्रमण हटाव मोहिम सुरू केली. रस्त्याच्या कामासाठी अतिक्रमण हटाविणे क्रमप्राप्त असले तरी महामार्ग विभागाच्या नियमापलीकडे जावून बळजबरीने आणि द्वेषपूर्ण भावनेने सदर कारवाई नगर परिषदेने केलेली आहे, असा आरोपही भाई रामदास जराते यांनी केला.

सदर कारवाईमुळे गरीब लोकांसाठी एक आणि शहरातील मोक्याच्या जागा बळकवणाऱ्या श्रीमंतांना एक असे वेगवेगळे नियम आणि कायदे असल्याचे प्रशासनाने दाखवून दिले आहे. हा प्रकार अत्यंत निंदनीय असून कोरोनाने आधीच हतबल फुटपाथ दुकानदारांना उपासमारीच्या खाईत लोटणारा असल्याचे वास्तवही भाई रामदास जराते यांनी एकनाथ शिंदे यांच्या लक्षात आणून दिले आहे.

प्रशासनाच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या नियमापलीकडे जावून केली जाणारी नगरपालिका, गडचिरोली ची कारवाई तातडीने थांबविण्यात यावी, अशी मागणी करुन सदरची कारवाई न थांबविल्यास नगर परिषद गडचिरोलीच्या कार्यालयावर उद्या, बुधवारी दुपारी १ वाजता अन्यायग्रस्त फुटपाथ दुकानदारांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयासह मोर्चा काढण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

सदर निवेदन जिल्हाधिकारी, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता, नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांनाही पाठविण्यात आले आहे.