गोकुळनगर – आटीआय बायपास रस्त्याची दुरुस्ती तत्काळ करा : विजय गोरडवार

147

– राकाँचे विजय गोरडवार यांच्यासह कार्यकर्त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना दिले निवेदन

– बायपास रस्त्याची केली पाहणी

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : स्थानिक गोकुळनगर – आयटीआय बायपास रस्त्याची मोठ्या प्रमाणावर दुर्दशा झाली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे नागरिकांना या रस्त्याने आवागमन करताना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन सदर रस्त्याची दुरुस्ती तत्काळ करण्यात यावी, अशी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते तथा नगर परिषदेचे माजी सभापती विजय गोरडवार व कार्यकर्त्यांंनी केली आहे. सदर रस्त्याची पाहणी केल्यानंतर विजय गोरडवार यांच्या नेतृत्वात एका शिष्टमंडळाच्या वतीने गडचिरोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

निवेदनात विजय गोरडवार म्हणाले, आपण नगरसेवक असताना आपल्या प्रयत्नाने व पाठपुराव्यामुळे विशेष रस्ता अनुदान योजने अंतर्गत सन 2016 मध्ये 1 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. 3 ऑक्टोबर 2016 रोजी ठराव मंजूर होऊन तांत्रिक मंजुरी मिळाली. मात्र प्रशासकीय मान्यता न मिळाल्याने काम सन 2018 नंतर सुरू झाले. या रस्त्याचे काम निकृष्ठ दर्जाचे झाले आहे. त्यामुळे अवघ्या दोन वर्षातच रस्त्याची दुर्दशा झाली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी उखळला आहे. गोकुळनगर – आयटीआय बायपास रस्ता अतिशय महत्त्वाचा असून गोकुळनगर व शहरातील नागरिक, कर्मचारी काम्प्लेक्सकडे याच रस्त्याने ये – जा करतात. त्यामुळे या रस्त्यावर नेहमीच दुचाकी व चारचाकी वाहनांची वर्दळ असते. याकरिता सदर रस्त्याकडे शासन व प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन रस्त्याची दुरुस्ती तत्काळ करावी, अशी मागणी निवेदनातून केली आहे.

सदर रस्त्याची पाहणी करताना व मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देताना शिष्टमंडळात गडचिरोली नगर परिषदेचे माजी सभापती तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते विजय गोरडवार यांच्यासह राकाँ कार्यकर्ते नईमभाई शेख, माजी नगरसेविका संध्याताई उईके, माजी नगरसेविका मिनलताई चिमूरकर, निताताई बोबाटे, मनोज मोहुर्ले, भास्कर निमजे, सुनील चिमूरकर अमोल कुळमेथे, अमर खंडाळे, प्रसाद पवार, अजय कुकडकर, नितीन पिपरे आदी उपस्थित होते.