महिला पोलीस शिपाईची विष प्राशन करून आत्महत्या

72

– गडचिरोली शहरातील खळबळजनक घटना

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली पोलीस वसाहतीत राहणाऱ्या महिला पोलीस शिपाईने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना शनिवारच्या रात्री १०.३० वाजताच्या घडली. प्रणाली काटकर (३५) असे आत्महत्या केलेल्या महिला पोलीस शिपाईचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतक महिला पोलीस शिपाई प्रणाली काटकर गडचिरोली मुख्यालयात दोन वर्षांंपासून कार्यरत होत्या. त्यांचे लग्नही पोलीस शिपाई संदीप पराते  यांच्याशी दोनवर्षा आधी झाले असून ते सुद्धा गडचिरोली मुख्यालयात कार्यरत आहेत. मृतक महिला पोलीस शिपाई ही संदीप पराते यांची दुसरी पत्नी आहे. या दोघांमध्ये सातत्याने वाद होते. दरम्यान, २९ जानेवारी रोजी कौटुंबिक वाद विकोपाला गेल्याने प्रणालीने विष प्राशन केले. पती संदीप पराते यांना पत्नी विष प्राशन केल्याचे लक्षात येताच त्यांनी लगेच उपचारार्थ गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात  हलविले. त्यावेळी डॉक्टरांनी रात्री १०.३० वाजताच्या दरम्यान मृत घोषित केले. गडचिरोली पोलीस ठाण्याचे अधिकारी रात्रीच रुग्णालयात पोहोचून अधिक तपास सुरू केला. सदर महिला पोलिस शिपाईने आत्महत्या केल्याने पोलीस वसाहतीत सर्वत्र खळबळ उडाली आहे. सदर घटनेचा तपास पोलीस निरीक्षक अरविंदकुमार कतलाम यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक पूनम गोऱ्हे करीत आहेत.