२४ तास वीजपुरवठा करण्याचा प्रश्न निकाली काढून धान खरेदीस मुदतवाढ देण्यात यावी

87

– आमदार गजबेंची जिल्हाधिकाऱ्यांमार्फत संबंधित मंञ्यांकडे मागणी

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली जिल्हा आदिवासीबहुल नक्षलग्रस्त, अतिदुर्गम व अतिसंवेदनशील भागात वसलेला असुन उद्योग विरहित जिल्हा असल्याने येथील शेतक-यांचे जीवनमान पुर्णता धान पिकावर अवलंबून आहे. त्यामुळे पर्यायी सिंचन सुविधेच्या कृषी पंपाना २४ तास सुरळीत विज पुरवठा करुन शासकीय धान खरेदीस मुदतवाढ देण्याची मागणी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांनी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंञी ना. छगन भुजबळ, ऊर्जा मंञी नितीन राऊत व गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांना गडचिरोली जिल्हाधिकारी संजय मिना यांच्या मार्फत पाठवलेल्या निवेदनातुन केली आहे.
दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, राज्य शासनाला गडचिरोली जिल्ह्यात ९ जानेवारी २०२२ पर्यंत शेतक-यांच्या कृषी पंपाना सुरळीत २४ तास विज पुरवठा करण्याची सभागृहात मागणी करण्यात आली होती. त्यावेळी राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी याबाबत लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते. माञ दिलेल्या आश्वासनांची पुर्तता न करता उलट शासन परिपञक काढुन ८ तासच विज पुरवठा करण्याचे निर्देश दिल्याने विज वितरण कंपनिचे अधिकारी २४ तास वीजपुरवठा करण्यास असमर्थता दर्शवित आहेत. यामुळे शेतक-यांत असंतोष खदखदु लागला असुन शेतक-यांच्या जगण्या मरण्याचा प्रश्न ऐरणीवर आला असल्याने याबाबत कधिही उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
खरीप हंगामात झालेला अवकाळी पाऊस गारपिट व तद्नंतर धान पिकावर झालेल्या मावा तुडतुड्याच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनात प्रचंड घट आली आहे. त्यामुळे येथील शेतकरी उन्हाळी धान फसल लागवड करण्याच्या तयारीत असतानाच १६ तासाचे खंड पाडुन विज पुरवठा करण्यात येत असल्याने एकुण फसलच बरबाद करण्याचा घाट घातला जात आहे. ही गंभीर बाब असुन नैसर्गिक आपत्तीस तोंड देत असलेल्या शेतक-यांना सावरणे अत्यावश्यक झाले आहे. तसेच शासकीय स्तरावरुन ३१ जानेवारी पर्यंतच धान खरेदी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. वेळेत उपलब्ध होत नसलेले गोडाऊन व संपावर असलेल्या तलाठ्यांमुळे अद्यावत सातबारा मिळण्यास विलंब होत असल्याने अद्यापही मोठ्या प्रमाणात शेतकरी धान विक्री पासुन वंचित आहेत. खंडित वीजपुरवठा व वेळेत होऊ न शकलेली धान खरेदी यामुळे येथील शेतकरी पुरते बरबादीच्या उंबरठ्यावर उभे राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शेतक-यांवर कुठल्याही प्रकारचा अन्याय होऊ नये यास्तव शेतक-यांच्या कृषी पंपाना यथाशिघ्र २४ तास सुरळीत विज पुरवठा करण्यासह धान खरेदीची मुदतवाढ वाढवून देण्याची मागणी आमदार गजबे यांनी संबंधित विभागाच्या मंञ्यांसह गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्याकडे गडचिरोली जिल्हाधिकारी यांच्या मार्फत केली आहे. याबाबत शासन स्तरावरुन काय निर्णय घेतल्या जाते याकडे येथील शेतक-यांचे लक्ष लागुन आहे.