वं. राष्ट्रसंतांचे विचार गावागावात पोहचविणारे नानाजी महाराज वाढई हे खरे समाजसेवक : आमदार डॉ. देवरावजी होळी

120

– प्रेस क्लब गडचिरोलीच्या वतीने आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या हस्ते नानाजी महाराज वाढई यांचा गडचिरोली जिल्हा गौरव पुरस्काराने सन्मान

– नानाजी महाराज वाढई यांनी आजीवन प्रचारक राहून वंदनीय राष्ट्रसंतांचे केलेले काम खरोखरच अभिनंदनीय

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : दलितमित्र तथा श्री गुरुदेव आश्रम गुरुकुंज मोझरी अमरावतीचे आजीवन प्रचारक नानाजी महाराज वाढई यांनी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे विचार गावागावात पोहचावे यासाठी केलेले कार्य खरोखरच अभिनंदनीय असून नानाजी महाराज हे खरे समाजसेवक असल्याचे प्रतिपादन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी प्रेस क्लब गडचिरोलीच्या वतीने आयोजित गडचिरोली जिल्हा गौरव पुरस्कार समारंभाप्रसंगी केले. यावेळी २०२२ चा गडचिरोली जिल्हा गौरव पुरस्कार आमदार डॉ देवरावजी होळी यांच्या हस्ते नानाजी महाराज वाढई यांना प्रदान करण्यात आला. यावेळी मंचावर श्री गुरुदेव सेवा मंडळाचे जिल्हाध्यक्ष डॉ. शिवनाथजी कुंभारे, जिल्हा माहिती अधिकारी सचिनजी अडसूळ, प्रेस क्लबचे अध्यक्ष मनोजजी ताजणे, सचिव मिलिंदजी उमरे, पंचायत समितीचे सभापती मारोतरावजी ईचोडकर, सत्कारमूूर्ती नानाजी महाराज वाढई प्रामुख्याने उपस्थित होते.

मराठी पत्रकारितेचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त प्रेस क्लब गडचिरोली द्वारा “गडचिरोली जिल्हा गौरव पुरस्कार” सोहळा पत्रकार भवन गडचिरोली येथे आयोजित करण्यात आला. नानाजी महाराज वाढई यांनी आपले संपूर्ण आयुष्य राष्ट्रसंतांच्या विचाराने प्रेरित होऊन त्यांचे विचार गावागावात पोहचविण्यासाठी सातत्याने कार्य केले. आपल्या गडचिरोली सारख्या अति दुर्गम भागातही त्यांनी खेडोपाडी जाऊन राष्ट्रसंतांचे विचार पोहचविले. त्यांनी केलेले काम खरोखरच अभिनंदनीय आहे. यावर्षी गडचिरोली जिल्हा गौरव पुरस्कार नानाजी महाराज यांना देण्याचा प्रेस क्लब गडचिरोलीचा निर्णय हा खरोखरच कौतुकास्पद असून एका खऱ्या समाजसेवकाला आपल्या हस्ते पुरस्कार देत असल्याचा आनंदही होत असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमाला पत्रकार बंधु, गुरुदेव भक्त व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.