सेंद्रीय भात शेतीमध्ये अझोला तंत्रज्ञान उपयुक्त : डॉ. एन.जी. शाह

92

– अझोला तंत्रज्ञान शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोला आणि राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोग, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने कृषि महाविद्यालय नागपूर व कृषि विज्ञान केंद्र, सोनापूर-गडचिरोली यांच्या मार्फत “अझोला तंत्रज्ञान शेतकरी प्रशिक्षण” कार्यक्रमाचे आयोजन 21 डिसेंबर 2021 रोजी कृषि विज्ञान केंद्र, सोनापूर-गडचिरोली येथे करण्यात आले. “अझोला तंत्रज्ञान एक दिवसीय प्रशिक्षण” कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. एन.जी. शाह, सदस्य सचिव, राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोग मुंबई यांच्या हस्ते पार पडले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. सी. डी. मायी, माजी अध्यक्ष कृषि वैज्ञानिक भरती निवड मंडळ, नवी दिल्ली तथा कार्यकारी परिषद सदस्य, डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ अकोला होते. तसेच डॉ. ए. व्ही. सप्रे, मार्गदर्शक, राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोग मुंबई, डॉ. आर. संदेश, आय. डी. सी., आय. आय. टी. मुंबई, डॉ. प्रगती गोखले, संथापक, मार्केट मिरची, संदिप कहाळे, कार्यक्रम समन्वयक, कृषि विज्ञान केंद्र, सोनापूर-गडचिरोली, डॉ. सुभाष पोटदुखे, मुख्य अन्वेषक तथा प्राध्यापक, वनस्पती रोगशास्त्र विभाग, कृषि महाविद्यालय, नागपूर तसेच जिल्यातील शेतकरी उपस्थित होते.

डॉ. एन. जी. शाह, सदस्य सचिव, राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोग मुंबई यांनी अझोला नत्र पुरविणारी वनस्पती आणि हिरवळीचे खत म्हणून चांगला उपयोग होऊ शकतो. अझोल्यामध्ये नत्र आणि पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने तो जमिनीत टाकल्याने लवकर कुजतो व त्या पासुन उत्तम प्रतिचे सेंद्रीय खत तयार होते, असे प्रतिपादन केले. डॉ. सी. डी. मायी उद्घाटनप्रसंगी म्हणाले की, अझोला ही एक पाण्यावर तरंगणारी नेचे वर्गातील पाणवनस्पती आहे. ही वनस्पती अतिशय थोड्या अन्नावर उत्तम प्रकारे व झपाट्याने वाढणारी वनस्पती आहे. तसेच सेंद्रीय शेती करण्याच्या दृष्टीने हिरवळीचे खत म्हणून अझोल्याचा वापर केल्यास उत्पादनात वाढ होत असल्याचे मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे शास्त्रोक्त पध्दतीने अझोला उत्पादन वाढविण्याच्या पध्दती, धान शेतीमध्ये अझोल्याचा वापर करण्याची पध्दती, दुग्ध उत्पादनाकरीता अझोलाचे कार्य याविषयी उपस्थित शेतकन्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. अशा बहुआयामी अझोला तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकन्यांनी अंगीकार करावा, असे आवाहन डॉ. मायी यांनी शेतकऱ्यांना केले. डॉ. सुभाष पोटदुखे, मुख्य अन्वेषक तथा प्राध्यापक, वनस्पती रोगशास्त्र विभाग, कृषि महाविद्यालय नागपूर यांनी ऑझोला तंत्रज्ञान विषयी प्रस्तावना सादर केली. अझोल्यामध्ये नत्र आणि पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने तो जमिनीत टाकल्याने लवकर कुजतो व त्या पासुन उत्तम प्रतिचे सेंद्रीय खत तयार होते, असे प्रतिपादन केले. तसेच अझोला वाढीसाठी पाण्याची गरज अत्यावश्यक असते म्हणून त्याचा धान पिकासाठी चांगला उपयोग होतो. शिवाय सेंद्रीय खतामुळे जमिनीचा पोत सुधारतो असे सांगितले. सदर अझोला तंत्रज्ञान एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे संचालन ज्ञानेश्वर ताथोड यांनी केले. प्रविण आर. नामुर्ते, प्रकल्प सहाय्यक, अझोला तंत्रज्ञान यांनी सदर शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजनाकरिता परिश्रम घेतले.