संघटनेच्या माध्यमातून सामाजिक कार्यासाठी पुढे यावे : म. रा. पत्रकार संघाचे विभागीय अध्यक्ष प्रा. महेश पानसे 

121

– महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ जिल्हा गडचिरोलीची आढावा बैठक

गडचिरोली : कुठल्याही संघटनेमध्ये फार मोठी ताकद असते. त्यामुळे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाला अधिक बळकट करण्यासाठी संघाच्या माध्यमातून पत्रकारितेसोबतच सामाजिक कार्यासाठी हिरीरीने पुढे यावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य  पत्रकार संघाचे विभागीय अध्यक्ष प्रा. महेश पानसे यांनी केले. रविवार, 5 डिसेंबरला येथील पत्रकार भवनात आयोजित महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. प्रा. पानसे पुढे म्हणाले की, कोरोना महामारीमुळे मागील दोन वर्षांंपासून गडचिरोली जिल्हयात आढावा बैठक घेण्यात आली नव्हती. मात्र संघटनेच्या कार्याविषयी वरिष्ठांपासून ते तालुका पातळीवरच्या सदस्यांशी संवाद सातत्याने सुरू होते. मात्र आता प्रत्येक तालुक्यात बैठका आयोजित करून समाजात आपली प्रतीमा उंचावण्यासाठी संघटनेचे पदाधिकारी व सदस्यांनी सामान्य नागरिकांपर्यंत पोहचून सामाजिक उपक्रम राबविण्यात यावे, अशा सूचनाही प्रा. पानसे यांनी यावेळी दिल्या.

संघटनेचा फायदा, संघटना वाढविण्याची गरज यावर त्यांनी विस्तृत मार्गदर्शन करीत आपल्या मागण्या, न्याय हक्कासाठी पत्रकारांना एकजूट होणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्व भाषीक पत्रकारांना एकाच छत्रछायेत येण्याच्या दृष्टीने व संघटनेत समावेश करण्याच्या हेतुने महाराष्ट्र राज्य  पत्रकार संघाची नव्याने नोंदणी करण्यात आली असून महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ असे करण्यात आले आहे. त्याचा फायदा अतिदुर्गम व शेवटच्या टोकावर काम करणाऱ्या पत्रकारांना होणार आहे. त्यामुळे संघटनेच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी दिलेल्या जबाबदारीचे निष्ठेने काम करण्याची आवश्यकता असल्याचे संघटनेचे अध्यक्ष प्रा. महेश पानसे यांनी सांगितले. कोरोना संक्रमणातील संकटे व संघटनेचा फायदा याबद्दल उदाहरणासहीत विस्तृत मार्गदर्शन केले. ते म्हणाले, कोराेना संक्रमणामुळे महाराष्ट्रातील 257 पत्रकारांंना आपला जीव गमवावा लागला. त्यातील महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेचे 200 हुन अधिक सदस्यांचा समावेश आहे. कोरोना काळात महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील गरजू गावांत 37 ट्रक इतका जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करण्यात आला. ठिकठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले. हे सर्व संघटनेच्या माध्यमातूनच साध्य करता आले. महाराष्ट्रातील अनेक दुर्गम भागांत व तळागळात काम करणाऱ्या पत्रकारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. कोरोना काळात पत्रकारांचा सामाजिक कार्यात मोलाचा वाटा आहे. असे असतानाही पत्रकार कोरोना योद्धा का होऊ शकला नाही, ही चिंतनाची बाब असल्याचे ते म्हणाले.

या आढावा बैठकीला महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेचे विभागीय अध्यक्ष प्रा. महेश पानसे, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष रुपराज वाकोडे, नसीर हाशमी, श्रीधर दुग्गीरालापाटी, सोपानदेव म्हशाखेत्री, ओम चुनारकर, अभय इंदूरकर, घनशाम म्हशाखेत्री, आनंद बिश्वास, निलेश टोंगे, अनिल तिडके, किशोर खेवले, पंकज चहांदे, शेखर फुलमाडी, विजय भैसारे, मुक्तेश्वर म्हशाखेत्री, मिलिंद खोंड, पांडूरंग कांबळे, हेमंत उपाध्ये, राजेंद्र सहारे आदी  पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.