काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले होणार मोर्चात सहभागी

59

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, १८ डिसेंबर २०२२ : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री असताना देखील गडचिरोली जिल्ह्यातील अजूनही समस्या सुटलेल्या नाही. सततच्या पूरपरिस्थितीमुळे व मेडिगठ्ठा धरणामुळे देखील फक्त जिल्ह्यातीलच नाही तर जिल्ह्याशेजारील देखील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. मात्र सरकारचे या सर्व शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष होत आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वाघांची संख्या वाढलेली असताना दिवसेंदिवस वाघांच्या हल्ल्यामुळे अनेकांना जीवही गमवावे लागत आहे. तरीही सरकारने याबाबतीत आतापर्यंत कोणतेही ठोस पाऊल उचलल्याचे दिसत नाही, इतकेच नाही तर सरकार 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करू पाहत आहे. असे झाल्यास गडचिरोली जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये शाळा बंद पडतील आणि गाव खेड्यातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतील त्याचबरोबर अनेक वर्षापासून आष्टी – सिरोंचा महामार्ग खराब झाले असून त्यामुळे देखील लोकांना आपला जीव गमवावा लागत आहे. मात्र अद्यापही रस्त्याचे काम झालेले नाही. जिल्ह्यातील या सर्व समस्या शासन दरबारी लावण्याकरिता व जिल्ह्याच्या विकासाकडे सरकारचे लक्ष वेधून जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा देण्याकरिता गडचिरोली जिल्ह्यातील विविध मागण्यांना घेऊन गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांच्या नेतृत्वात गडचिरोली ते नागपूर विधान भवन 175 किलोमीटरचा ऐतिहासिक मोर्चा 14 डिसेंबरपासून गडचिरोली येथून रवाना झालेला आहे. हा मोर्चा 21 डिसेंबर रोजी नागपूर विधान भवनावर धडकणार असून या मोर्चात गडचिरोली जिल्ह्यातून 5000 च्या जवळपास शेतकरी महिला युवक आणि जिल्ह्यातील नागरिक सहभागी होणार आहेत व स्वतः महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांच्यासह राज्यातील काँग्रेसचे अनेक नेते मंडळी आमदार सुद्धा सहभागी होणार आहेत.
काँग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले, नागपूर पदवीधर मतदार संघाचे आमदार अभिजीत वंजारी, आमदार विकास ठाकरे, काँग्रेस नेते विशाल मुत्तेमवार यांची भेट घेऊन मोर्चात सहभागी होण्याचे निमंत्रण गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी दिले.