चामोर्शी शहर हे दारूमुक्त करा अथवा दारूयुक्त करा : युवा संघाची पत्रकार परिषदेतून मागणी

375

विदर्भ क्रांती न्यूज

चामोर्शी : गडचिरोली जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका असलेल्या चामोर्शी शहरात दारू विक्री जोमा सुरू असून पाहिजे तेव्हा व पाहिजे तिथे दारू सहज उपलब्ध होत आहे. त्यामुळे प्रत्येक चौकाला दारूचे स्वरूप प्राप्त झाल्याने तळीरामांना सुगीचे दिवस आले आहेत. असे असले असले तरी मिळणारी दारू ही चांगली की भेसळ ओळखता येत नसल्याने व त्यासाठी जास्त रूपये द्यावे लागत असल्याने आधी अठराविश्व दारिद्रय असलेल्या कुटुंबाला दारूचा खर्च झेपत नसल्याने अनेक कुटुंब दारुमुळे उध्वस्त होताना दिसत आहेत. तसेच अनेकजण गाड्या सुद्धा दारू पिऊन चालवत असल्याने अपघाताच्या प्रमाणात सुद्धा वाढ झालेली आहे. त्यामुळे अशा दारू विक्रेत्यांवर कडक कारवाई करावी किंवा एक तर चामोर्शी शहर दारूमुक्त करावे किंवा पूर्णतः दारूयुक्त करावे, अशी मागणी अगरबत्ती प्रकल्प संताजी नगर चामोर्शी येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेतून केली.

शहराच्या महत्त्वाच्या ठिकाणी दारू विक्री होत असल्याने अनेक शालेय विद्यार्थिनींना शिट्या मारणे, वाईट नजरेने पाहणे, चौकाचौकात दारुड्या लोकांमुळे नाहक त्रास सहन करावा लागणे, अशा प्रकारच्या अनेक तक्रारी वाढलेल्या आहेत. म्हणून शहरातील पूर्णतः दारूबंदी करण्यात यावी व अशा दारू विक्रेत्यांवर तत्काळ प्रतिबंधात्मक कारवाई करावी आणि यापुढे शहरात कोणत्याही चौकात व अन्य ठिकाणी दारू मिळणार नाही याची खबरदारी सुद्धा घेण्यात यावी. असे न झाल्यास युवा संघाच्या वतीने प्रत्येक प्रभागातील महिलांचा विराट मोर्चा पोलीस अधीक्षक कार्यालयावर काढण्यात येईल व या संबंधाने तशी मागणी खासदार अशोक नेते, आमदार डॉक्टर देवराव होळी तसेच जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्याकडे सुद्धा लेखी तक्रार करत असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली.
या पत्रकार परिषदेला युवा संघाचे अध्यक्ष तथा नगरसेवक आशिष पिपरे, रमेश अधिकारी, निखिल धोडरे, हेमंत चलाख, अभिषेक कोत्तावार, राहुल सोयाम, श्रीकांत श्रीमंतवार, राहुल हजारे, आर्यन गव्हारे, भूषण सयाम आदी व शहरातील तरुण उपस्थित होते.

”याबद्दल चामोर्शी ठाण्याचे ठाणेदार बिपिन शेवाळे यांची विचारना केली असता ते म्हणाले की, याबाबत युवा संघाचे अध्यक्ष तथा नगरसेवक यांनी माझ्याकडे निवेदन दिलेले असून कोणीही दारू विकताना शहरात दिसला तर त्याच्यावर योग्य ती कडक कारवाई करण्यात येईल व दारु विक्रेत्यांच्या मुसक्या आवळ्यासाठी आमच्या पोलीस शिपायांची गस्त सुद्धा वाढवलेली आहे.”