सुरजागडचा संघर्ष आणखी तीव्र करु : सैनू गोटा

114

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : संविधानाच्या तरतुदी आणि कायद्यांची पायमल्ली करून जिल्ह्यात खाणी खोदून आदिवासींच्या हक्कांवर गदा आणली जात आहे. त्याविरुध्द आवाज उठविणारे नेते, कार्यकर्ते आणि स्थानिक पारंपरिक प्रमुखांना बदनाम करुन खदानविरोधी आंदोलन दडपून टाकण्याचा प्रयत्न कंपनी आणि सरकार करीत आहे. मात्र हा कारस्थान हाणून पाडून सुरजागडसह संपूर्ण बेकायदेशीर लोह खदानींच्या विरोधातील जनतेचा संघर्ष आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचा इशारा सुरजागड पारंपारिक इलाख्याचे प्रमुख, जि.प.सदस्य सैनू गोटा यांनी दिला.

ओअदाल पेन (ठाकूरदेव) यात्रेच्या निमित्ताने शेवटच्या दिवशी झालेल्या ‘खदान विरोधी जनसभेत’ ते बोलत होते. यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य कार्यकारिणी सदस्य काॅ. महेश कोपूलवार, जिल्हा सचिव काॅ. देवराव चवळे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव काॅ. अमोल मारकवार, शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई रामदास जराते, जयश्री वेळदा, पत्रकार हेमंत डोर्लीकर, काॅ. संजय वाकडे, पं. स. सदस्य शिला गोटा, सुरजागडच्या माजी सरपंच कल्पना आलाम, सरपंच करुणा सडमेक, मंगेश होळी, लक्ष्मण नवडी, मंगेश नरोटे, मुंशी दुर्वा, पत्तु पोटावी प्रामुख्याने उपस्थित होते.

मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव काॅ. अमोल मारकवार यांनी खदानविरोधी नेते आणि कार्यकर्ते यांच्यात भिती निर्माण करण्यासाठीच पारंपरिक यात्रेच्या ठिकाणी पोलिस आणि कंपनीने हस्तक्षेप केला असल्याचा आरोप केला. प्रति कार्यक्रमांच्या आयोजनातून केलेली लुडबुड धोकादायक असून ते यापुढे सहन केले जाणार नसून सरकारने कितीही दमन केला तरीही खदानविरोधी संघर्ष हा दिल्लीपर्यंत पोहोचविल्या जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

सुरजागडची लोह खदान ही बेकायदा असतानाही ती बळाचा वापर करून बळजबरी खोदली जात आहे. ग्रामसभांनी शेकडो निवेदनाच्या माध्यमातून प्रशासनाकडे पाठपुरावा केल्यानंतरही प्रशासन त्याचे एकाही ओळीचे उत्तर देवू शकलेले नसल्याने त्याची जाणीव ठाकुरदेव यात्रेनिमित्त प्रशासनाला करून द्यावी आणि पुन्हा एकदा बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात यावा, असा ठराव सुरजागड पारंपारिक इलाख्याच्या वतीने भाई रामदास जराते यांनी यावेळी मांडला.

भारतीय कम्युनिस्ट पक्ष नेहमीच जिल्ह्यातील आदिवासी जनतेच्या दमन, अन्याय, अत्याचार आणि हक्क, अधिकारासाठी लढत असलेला पक्ष असून, पारंपरिक उत्सवातून प्रेरणा घेऊन हक्कांसाठी निरंतरपणे रस्त्यावरची लढाई कायम ठेवावी, असे आवाहन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य कार्यकारिणी सदस्य काॅ. महेश कोपूलवार यांनी यावेळी आदिवासी बांधवांना केले. दरम्यान काॅ. देवराव चवळे, पत्रकार हेमंत डोर्लीकर यांनीही यावेळी सभेला मार्गदर्शन केले.