गडचिरोली पोलीस दलातर्फे आयोजित दुचाकी व चारचाकी वाहन चालक प्रशिक्षणाचा थाटात समारोप

99

– बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली जिल्हयातील नक्षलग्रस्त, दुर्गम व अतिदुर्गम भागातील बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने गडचिरोली पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून जिल्ह्यातील युवक-युवतींना दुचाकी व चारचाकी वाहन चालक प्रशिक्षण देवून त्यांना रोजगारासाठी आत्मनिर्भर होण्याच्या उद्देशाने पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या संकल्पनेतून व अप्पर पोलीस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक (अभियान) सोमय मुंडे, अहेरी येेथील अप्पर पोलीस अधीक्षक अनुज तारे यांच्या मार्गदर्शनाखाली दुचाकी व चारचाकी वाहन चालक प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. सदर प्रशिक्षण आज, ७ डिसेंंबर रोजी पूर्ण झाल्याने प्रशिक्षणार्थ्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम एकलव्य धाम, गडचिरोली येथे पार पाडण्यात आला. सदर दुचाकी व चारचाकी वाहन चालक प्रशिक्षण ८ नोव्हेंंबर २०२१ ते ७ डिसेंबर २०२१ पर्यंत एकुण ३० दिवसांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. यामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली, धानोरा, जिमलगट्टा, भामरागड, एटापल्ली, अहेरी, सिरोंचा या उपविभागातील अतिदुर्गम असलेल्या भागातील रहीवासी असलेल्या एकुण १३५ युवक-युवतींनी आपला सहभाग नोंदवला होता. प्रशिक्षणात सहभागी झालेल्या उमेदवारांना गडचिरोली पोलीस दलामार्फत दुचाकी व चारचाकी वाहन प्रशिक्षण देण्यात आले.
प्रशिक्षणादरम्यान सर्व उमेदवारांना दुचाकी-चारचाकी वाहन परवाना मोफत काढून देण्यात आले. आज वाहन चालक प्रशिक्षण पूर्ण झाल्याने निरोप समारंभ कार्यक्रमास प्रशिक्षण घेतलेले १३५ उमेदवार हजर होते. यादरम्यान उमेदवारांनी आपले मनोगत व्यक्त करताना गडचिरोली पोलीस दलाचे आभार मानले आहे. सदर कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) समीर शेख उपस्थित होते. गडचिरोली पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातूून आतापर्यंत बीओआय आरसेट व कृषी विज्ञान केंद्र गडचिरोली यांचे सहकार्याने ब्युटीपॉर्लर- ७०, मत्स्यपालन- ६०, कुक्कुटपालन- २९३,
शेळीपालन- ६७, लेडीज टेलर- ३५, फोटोग्रॉफी- ३५, मधुमक्षिका पालन- ३२, भाजीपाला लागवड- १९० तसेच टु व्हिलर व फोर व्हीलर ड्रायव्हिंग प्रशिक्षण- १०० अशा एकुण ८८२ युवक-युवतींना स्वयंरोजगारांचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. दुचाकी व चारचाकी वाहन चालक प्रशिक्षणाच्या यशस्वीतेसाठी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोस्टे, उपपोस्टे, पोमकेचे सर्व प्रभारी अधिकारी, नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी सपोनि महादेव शेलार व सर्व पोलीस अंमलदार यांनी विशेष परिश्रम घेतले.