Home गडचिरोली सैन्यदलातील जवान वालदे यांच्या सेवापूर्ती सोहळ्याला आमदार गजबे यांची उपस्थिती

सैन्यदलातील जवान वालदे यांच्या सेवापूर्ती सोहळ्याला आमदार गजबे यांची उपस्थिती

163

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिराेली : कुरखेडा तालुक्यातील तळेगाव येथील श्री डीसेज जयलालजी वालदे यांनी भारतीय सैन्य दलात १७ वर्षे देशातील विविध राज्यात देशसेवा केली आहे. ते याच महिन्यात सैन्यदलातील हवालदार या पदावरून निवृत्त झाले आहेत. त्यांचे मूळ गाव तळेगाव हे असून गावाच्या सुपुत्राने देशाचे रक्षण केल्याचा अभिमान असल्याने त्यांचा आदर्श शहरातील व गावातील नव्या उमेदीच्या तरूण पिढीने घ्यायला हवा, या हेतूने तसेच सेवानिवृत्त सैनिकाप्रती आणि भारतीय सैन्यात आपली सेवा देणाऱ्या तमाम सैनिकांप्रति आपली कृतज्ञता व्यक्त होईल म्हणून त्यांचा सन्मान करण्याचे माजी सैनिक संघटना काटोल व गडचिरोली यांनी ठरविले होते. त्यानुसार १९ मे २०२४ रोजी देसाईगंज येथील राजेंद्र वॉर्ड, आशीर्वाद कॉलनी येथे भारतीय सैन्य दलातील सेवानिवृत्त सैनिक श्री डीसेजजी वालदे यांचा सेवापूर्ती सोहळा आयोजित करण्यात आलेला होता. यावेळी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णाजी गजबे यांनी श्री डीसेजजी जयलालजी वालदे यांचा सत्कार करून पुढील कारकीर्द आरोग्यदायी, आनंददायी जावो अशा शुभेच्छा देऊन त्यांचे अभिनंदन केले.

याप्रसंगी आमदार गजबे म्हणाले की, आपल्या देशात घरोघरी विविध सण, उत्सव साजरे होत असतात. मात्र, देशाच्या सीमेवर लढणाऱ्या जवानांना कुठलाही सण नाही की उत्सव नाही. देशाची सुरक्षा करणे हेच एकमेव ध्येय त्यांच्यासमोर असते. श्री डीसेजजी वालदे हे १७ वर्षे देशाची सेवा करून निवृत्त झाले. ही आपल्या जिल्ह्यासाठी खूपच अभिमानाची गोष्ट आहे, असे प्रतिपादन आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णाजी गजबे यांनी केले.

यावेळी भाजपा महिला जिल्हा उपाध्यक्ष शालूताई दंडवते, कुरखेडा भाजपा तालुका अध्यक्ष चांगदेवजी फाये, कुरखेडा न. प. चे नगरसेवक अॕड. उमेशजी वालदे, सैन्यदलातील पदाधिकारी, सैन्यदिनातील माजी सैनिक, माजी सैनिक संघटना काटोल व गडचिरोली येथील पदाधिकारी व इतर मान्यवर मंडळी उपस्थित होते.

error: Content is protected !!