जन्मांध चेतनने दिली आदिवासी विद्यार्थ्यांना ऊर्जा

51

– क्रीडा स्पर्धेत प्रेरणादायी मार्गदर्शन : अंध कलाकारांचे संगीतमय आशावादी जीवन

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : वाशिम तालुक्यातील केकतउमरा या लहानशा गावातील रहिवासी असलेला व वाशिम जिल्हा नेत्रदान प्रचार समितीचा ब्रँड अँबेसिडर तसेच बाल कलाकार म्हणून नावारूपास आलेला चेतन पांडुरंग उचितकर या जन्मांध मुलाने गडचिरोली येथील शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळेत आयोजित केलेल्या प्रेरणादायी मार्गदर्शन कार्यक्रमात सर्वांची मने जिंकली व आदिवासी विद्यार्थ्यांना एक नवी ऊर्जा दिली.

येथील सेमाना बायपास रोडवरील धनुर्विद्या प्रशिक्षण केंद्राच्या मैदानावर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली अंतर्गत प्रकल्पस्तरीय क्रीडा संमेलन नुकतेच पार पडले. प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांच्या सूचनेनुसार क्रीडा संमेलनाच्या निमित्ताने रात्री चेतन सेवांकुर आर्केस्ट्रा वाशिमद्वारे संगीत कार्यक्रम व प्रेरणादायी मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात जीवनाशी संघर्ष करणारा जन्मांध चेतन व त्याच्या सहकारी अंध युवकांनी आपल्या गीतातून आशावादी जीवन जगण्याची प्रेरणा दिली. मनुष्याच्या जीवनात कितीही संकटे आली व शरिराने विकलांग असले तरी देखील मनात जिद्द असेल तर स्वतःचे नवे विश्व निर्माण करता येऊ शकते व अशक्य वाटणारी गोष्ट सुद्धा शक्य होते हेच अंध युवकांनी या कार्यक्रमातून दाखविण्याचा प्रयत्न केला. आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळेत दुर्गम व अतिदुर्गम भागातील तसेच प्रतिकूल परिस्थितीतून आलेल्या विद्यार्थ्यांच्या मनात चेतना निर्माण करण्याचा उद्देश या कार्यक्रमाच्या पाठीमागे होता.

जन्मांध असूनही प्रचंड आशावाद व हसरा चेहरा असलेला चेतन म्हणाला, मी अंध असल्याने काहीच पाहू शकत नाही. जगातले सौंदर्य मी आपल्या डोळ्यांनी न्याहाळू शकत नाही. तरीही मी आनंदाने जीवन जगत आहे. मग आपण सर्व डोळस आहात. त्यामुळे कुठल्याही प्रतिकूल परिस्थितीला न घाबरता विद्यार्थ्यांनी आपले उच्च ध्येय गाठावे. आपल्या अंगी असलेली गुणवत्ता सिद्ध करावी व आपल्या व्यक्तिमत्त्वाची छाप पाडावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. जन्मांध चेतनचा प्रवास मुळातच खडतर. गरीब शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या चेतनचे बालपण अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून गेले. पण त्याच्यातील सुप्त कलागुण त्याचे गरीब वडील व त्याची आई गंगा दोघांनीही हेरली व त्याच्यातील कलेला आकार दिला. अंधत्वावर मात करून संगीताद्वारे आज जगातील अंधाना व डोळसांनाही नवी सकारात्मक दृष्टी देणारा प्रकाशवाटरुपी चेतन हा नवा तारा भारताला मिळालेला आहे. केवळ महाराष्ट्रच नव्हे तर गोवा, कर्नाटक तसेच इतर राज्यात आपल्या उत्कृष्ट वकृत्वशैलीतून प्रबोधनाद्वारे व्यसनमुक्ती, नेत्रदान, हुंडाबळी, स्वच्छता अभियान, कन्या भ्रूणहत्या, विद्यार्थी आत्महत्या, शेतकऱ्यांची आत्महत्या आदी विषयावर त्यांनी आपली छाप सोडलेली आहे. संगीत कलेतून मिळालेल्या पैशांपैकी आपल्या गरजेपुरते पैसे ठेवून उर्वरित पैशाचा उपयोग तो गरीब, निराधार, अंध, गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी, त्यांच्या वैद्यकीय उपचारासाठी व सामाजिक सेवेसाठी करतो. चेतनसह १५ अंध मुलांचे पालक पांडुरंग उचितकर, अश्विनी पवार, विकास गाडेकर, दशरथ जोगदंड, विजय खडसे, गजानन दाभाडे, धीरज चोरपगार आदी कलाकारांचा सहभाग होता.

कार्यक्रमस्थळी सहाय्यक प्रकल्प अधिकारी अनिल सोमनकर, डॉ. प्रभू सादमवार, मुख्याध्यापिका वंदना महल्ले, प्रकल्प क्रीडा समन्वयक सतीश पवार, प्रमिला दहागावकर, प्राचार्य समशेरखान पठाण, संतोष कन्नाके, मुकेश गेडाम, प्रसिद्धी प्रमुख सुधीर शेंडे, महेश बोरेवार, आनंद बहिरेवार, नितीन चंबुलवार, किशोर चिलमवार, संध्या चिलमवार, प्रतिभा बनाईत, देवीदास चोपडे, निमा राठोड आदींसह कर्मचारी, विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी लायन्स क्लब गडचिरोली, सच्चिदानंद ट्रॅक्टर्स गडचिरोली, राजमाता राजकुवर शिक्षण संस्था अहेरी, आदिवासी युवक आश्रमशाळा कन्हाळगाव, अनुदानित आश्रम शाळा जपतलाई, चांदाळा, मुरमाडी, गट्टा, गुंडापल्ली, गिरोला यांनी पुढाकार घेतला.