देवदा- रेगडी दिना नदीवरील पुलाच्या बांधकामाला सुरुवात

51

– माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी यांच्या प्रयत्नांना यश

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : देवदा- रेगडी दिना नदीवरील बहुचर्चित पुलाच्या बांधकामाला प्रत्यक्षात सुरुवात झाली आहे. माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी यांनी शासनाकडे पाठपुरावा केल्याने अखेर सदर पुलाच्या कामाला सुरुवात झाली असून डॉ. उसेंडी यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.

महाविकास आघाडीची सत्ता असताना तत्कालीन बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे महाराष्ट्र राज्याचे आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी यांनी पाठपुरवा करून देवदा- रेगडी दिना नदीवरील बहुचर्चित पुलाच्या बांधकामासाठी निधी मंजूर करून घेतलेला होता. परंतु येथील लोकप्रतिनिधी व बांधकाम विभागाच्या दुर्लक्षतेमुळे अजूनपर्यंत रेगडी- देवदा या बहुचर्चित मार्गावरील दिना नदीवरील पुलाच्या बांधकामाला सुरुवात झाली नव्हती.

प्रत्यक्षात या नदीवरील पाहणी करताना पुलियाच्या बांधकामात येथील लोकप्रतिनिधी व अधिकारी यांच्या निष्काळजीने अजूनपर्यंत बांधकामाला सुरुवात झाली नसल्याने, बांधकामाचे काम तत्काळ सुरु करण्यात यावे, असे निर्देश अधिकाऱ्यांना दिले होते. आज प्रत्यक्षात या कामाला सुरुवात झाल्याने, गडचिरोली – चामोर्शी-रेगडीच्या नागरिकांना आलापल्ली व मुलचेराला जाण्यायेण्यासाठी सोयीचे होऊन पावसाळ्यात येथील नागरिकांची गैरसोय होणार नसल्याने या परिसरातील नागरिकांनी माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी व शासनाचे आभार मानले आहे.