Home गडचिरोली कोनसरी येथील लोहखनिज प्रकल्पात स्थानिक युवकांना रोजगाराची संधी द्यावी

कोनसरी येथील लोहखनिज प्रकल्पात स्थानिक युवकांना रोजगाराची संधी द्यावी

106

– प्रदेश युवक कॉंग्रेसचे सचिव विश्वजीत कोवासे यांचे उद्योग मंत्री उदय सामंत यांना निवेदन

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील कोनसरी येथे सुरू होत असलेल्या लोहखनिज प्रकल्पात स्थानिक युवकांना प्राधान्याने रोजगाराची संधी उपलब्ध करून न्याय देण्यात यावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसचे सचिव विश्वजीत मारोतराव कोवासे यांनी राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे निवेदनातून केली आहे. ना. उदय सामंत २४ नोव्हेंबर रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता विश्वजित कोवासे यांनी जिल्ह्यातील समस्यांवर चर्चा करून त्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले.

सध्या गडचिरोली जिल्ह्यात सुरजागड येथे लोहखनिज उत्खनन सुरू आहे. हा आदिवासीबहुल, नक्षलग्रस्त व उद्योगविरहीत भाग म्हणून ओळखला जातो. सुरजागड येथील लोहखनिज उत्खननामध्ये स्थानिक युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळेल. तसेच कोनसरी येथे सुरू होत असलेल्या लोहखनिज प्रकल्पात नोकरीची संधी देखील स्थानिकांना प्राप्त होईल, अशी स्थानिकांची अपेक्षा होती. परंतु सदर प्रकल्पात मोठ्या प्रमाणात परराज्यातील कुशल व अकुशल कामगारांची भरती सुरू आहे. हा स्थानिक युवकांवर अन्याय आहे. हा अन्याय दूर करण्यासाठी परराज्यातील युवकांची भरती बंद करून येथील युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी विश्वजीत कोवासे यांनी निवेदनातून केली आहे.

या परिसरात रस्ते, सिंचन, शिक्षण व आरोग्य या सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे हा संपूर्ण भाग अविकसित आहे. या भागातील स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध करून दिल्यास व वरील सुविधा या भागात निर्माण केल्यास या भागाचा विकास होण्यास मदत होईल. तसेच सदर लोहप्रकल्पावर आधारित स्वयंरोजगाराची संधी येथील युवकांना मिळावी, यासाठी प्रशिक्षण केंद्र निर्माण करून त्यांना मोठ्या प्रमाणात रोजगार प्राप्त करून द्यावा, अशीही मागणी महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसचे सचिव विश्वजीत मारोतराव कोवासे यांनी राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे निवेदनातून केली आहे.

यावेळी कॉंग्रेसचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव डॉ. नामदेवराव किरसान, मिलिंद खोब्रागडे, रजनीकांत मोटघरे, नितेश राठोड, आदिवासी कॉंग्रेस आघाडीचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष छगन शेडमाके, अनिल कोठारे, नेताजी गावतुरे, वसंता राऊत, प्रभाकर वासेकर, देवाजी सोनटक्के, शंकरराव सालोटकर, हरबाजी मोरे, भूपेश कोलते, दत्तात्रय खरवडे, महादेव भोयर, लालाजी सातपुते, देवेंद्र भोयर, बाबुराव गडसुलवार, सुदर्शन उंदिरवाडे, परसुराम गेडाम, श्रीकांत भजभुजे, बबिता उसेंडी आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!