विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : देसाईगंज (वडसा) तालुक्यातील नयनपूर वार्ड येथील श्रीमती नवनिता नवलाजी शेंडे (वय ४७) यांचा 19 एप्रिल 2023 रोजी सर्पदंशामुळे मृत्यू झालेला होता. त्यांची शेतजमीन नयनपूर या क्षेत्रात असून नेहमीप्रमाणे त्या शेतावर गेले असता त्यांना सर्पदंश होऊन त्यांचा अपघाती मृत्यू झाला. संबंधित घटनेची माहिती कृषी विभागास प्राप्त झाल्यानंतर गोपीनाथ मुंडे अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना अंतर्गत संबंधित प्रस्ताव शासनास पाठविण्यात आला व त्यानुसार सानुग्रह निधीची रक्कम रुपये दोन लाख रुपये मंजूर झाले. सदर प्रस्ताव तयार करण्याकरता कृषी पर्यवेक्षक भूषण देशमुख व कृषी सहायक ठाकरे यांनी प्रस्ताव तयार केला. कार्यालयामार्फत प्रस्तावाची तालुकास्तरीय समितीसमोर तालुका कृषी अधिकारी पी. डी. खंडाळे, प्रभारी कृषी अधिकारी खोब्रागडे वडसा यांच्यामार्फत प्रस्ताव सादरीकरण व मांडणी आदी प्रक्रिया करण्यात आली.
दरम्यान, 6 ऑक्टोबर 2023 रोजी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णाजी गजबे यांच्या हस्ते मृतकाचे पती नवलाजी शेंडे यांना वारसदार म्हणून सानुग्रह निधीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. याप्रसंगी तालुका कृषी अधिकारी पी. डी. खंडाळे, कृषी पर्यवेक्षक खोब्रागडे, भूषण देशमुख, प्रशांत मते व आत्माचे बीटीएम व्ही. डी. रहांगडाले उपस्थित होते. मृतकाचे पती हे फर्निचरचा व्यवसाय करत असून त्यांची परिस्थिती ही अत्यंत नाजूक आहे. अशा परिस्थितीत त्यांना कृषी विभागाच्या शेतकरी अपघात योजना अंतर्गत मिळालेली रक्कम त्यांच्यासाठी आजच्या घडीला खूप महत्त्वाची ठरली. याबद्दल नवलाजी शेंडे यांनी आमदार कृष्णाजी गजबे तसेच कृषी विभागाचे आभार मानले.







