Home गडचिरोली कुणबी समाजाच्या महामोर्चाची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

कुणबी समाजाच्या महामोर्चाची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

370

– आरक्षणाच्या हक्कासाठी एकवटले समाज बांधव

– मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र न देण्याची मागणी

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, ५ ऑक्टोबर : राज्यातील मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात येऊ नये, जातनिहाय जनगणना करण्यात यावी, गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसींचे वर्ग ३ व ४ च्या नोकर भरतीतील आरक्षण पूर्ववत १९ टक्के करण्यात यावे यासह विविध मागण्यांच्या पुर्तेतेसाठी आज, ५ ऑक्टोबर रोजी कुणबी समाज सेवा समिती जिल्हा गडचिरोलीच्या वतीने महामोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार धडक देण्यात आली. या मोर्चात हजारोंच्या संख्येने समाज बांधव सहभागी झाले होते.

स्थानिक धानोरा मार्गावरील शिवाजी महाविद्यालयाच्या पटांगनातून निघालेला हा मोर्चा घोषणा देत जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. त्यानंतर बिहारच्या धर्तीवर राज्यात सर्व जातींचे जातीनिहाय जनगणना करण्यात यावी, महामहीम राज्यपालांच्या अधिसूचनेनुसार गडचिरोली जिल्ह्यासह इतर 12 जिल्ह्यातील पेसा क्षेत्रातील ओबीसींचे १७ संवर्गीय पदाचे आरक्षण शुन्य झाले असून हे असंविधानिक आहे. हा ओबीसी समाजावर फार मोठा अन्याय असून तो तत्काळ दूर करण्यात यावा, गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसींचे वर्ग ३ व ४ च्या नोकर भरतीतील आरक्षण पूर्ववत १९ टक्के करण्यात यावे, सरकारी नोकऱ्यांचे कंत्राटीकरण व बाह्य यंत्रनेमार्फत नोकर भरतीचा शासन निर्णय तत्काळ रद्द करण्यात येऊन सरकारी शाळा कार्पोरेट समूहाला देण्यात येऊ नये, सारथीच्या माध्यमातून सुरू असलेल्या सर्व योजना महाज्योतीच्या माध्यमातून तत्काळ सुरू करण्यात याव्या, अल्पसंख्यांक संस्थांना त्यांच्या आस्थापनेतील रिक्त पदभरतीसाठी देण्यात आलेली सूट, बहुजन समाजातील संस्थांना सुद्धा देण्यात यावी, राज्यात ओबीसींसाठी मंजूर असलेले ७२ वसतिगृह तत्काळ सुरू करण्यात यावे व प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना स्वाधार योजना लागू करण्यात यावी, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी जशाच्या तशा तत्काळ लागू कराव्यात, धानाला प्रती क्विंटल ४००० रुपये हमी भाव द्यावा, कुणबी समाजाला अट्रासिटी कायद्यांतर्गत संरक्षण देण्यात यावे, कुणबी समाजातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी परदेशी शिष्यवृत्तीचा लाभ देण्यात यावा आदी मांगण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्यामार्फत शासनाला निवेदन पाठविण्यात आले.

या महामोर्चात आरमोरी क्षेत्राचे आमदार कृष्णाजी गजबे, वरोरा – भद्रावती क्षेत्राच्या आमदार प्रतिभा धानोरकर, राजुरा क्षेत्राचे आमदार सुभाष धोटे, विधान परिषद सदस्य सुधाकर अडबाले, अभिजित वंजारी, माजी मंत्री परिणय फुके, माजी आमदार डॉ. रामकृष्ण मडावी, माजी आमदार आनंदराव गेडाम, भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, कॉंग्रेसचे प्रदेश महासचिव डॉ. नामदेवराव किरसान, विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी, विविध संघटनांचे कार्यकर्ते यांच्यासह गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील विविध तालुक्यातून कुणबी आणि ओबीसी समाज बांधव हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते. आरक्षणाच्या हक्कासाठी कुणबी व ओबीसी समाज बांधव एकवटल्याचे चित्र या महामोर्चातून दिसून आले. मोर्चादरम्यान गडचिरोली पोलिसांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता.

error: Content is protected !!