‘त्या’ अपघातातील पीडित कुटुंबियांच्या आम्ही पाठीशी

12

– लॅायड्स मेटल्सचे स्पष्टीकरण ; संचालकांनी घेतली मृतक अभियंत्यांच्या कुटुंबियांची भेट

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्याच्या सुरजागड पहाडावरील लोहखनिजाचे उत्खनन करताना ६ ऑगस्टच्या सायंकाळच्या सुमारास घडलेल्या अपघातात तीन अभियंत्यांना आपला जीव गमवावा लागला. यातील एक अभियंता अहेरी तालुक्यातील नागेपल्ली येथील असून उर्वरित दोन अभियंते झारखंड व ओडिशा राज्यातील होते. या अपघातातील इतर तीन जखमींवर उपचार सुरू असून पीडित कुटुंबियांच्या आम्ही पाठीशी असल्याचे स्पष्टीकरण लॅायड्स मेटल्स कंपनीने दिले आहे. दरम्यान, लॅायड्स मेटल्स कंपनीचे संचालक बी. प्रभाकरन यांनी सदर घटनेतील मृतक अभियंत्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन  त्यांना दिलासा दिला.

सदर घटनेतील मृतकांमध्ये मेकॅनिकल विभागाचे सहायक अभियंता सोनल खुशाबराव रामगिरवार (रा. आलापल्ली, जि. गडचिरोली), उपअभियंता ओम प्रकाश (रा. झारखंड), विद्युत विभागाचे सहाय्यक अभियंता नृसिंह राणा (रा. ओडिशा) या तिघांचा समावेश आहे. तसेच जखमींमध्ये कन्नीलाल बगर तिग्गा (रा. हेडरी), परमेश्वर बेरा आणि नाबो कुमार बेरा (रा. झारखंड) यांचा समावेश असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर कंपनीचे संचालक बी. प्रभाकरन यांनी वैयक्तिकरित्या मृतकांच्या कुटुंबियांची भेट घेतली. या कर्मचार्‍यांच्या जीवित हाणीमुळे व्यवस्थापनाला दु:ख झाले आहे. या दुःखाच्या क्षणी मृतांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे असल्याचे सांगत त्यांचे सांत्वन केले.

हा अपघात नेमका कसा घडला हे सुरजागड आयर्न ओर माईन्स लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेडचे कार्यकारी संचालक एस. व्यंकटेश्वरन यांनी स्पष्ट केले आहे. 6 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5.45 च्या सुमारास वर्कशॉपपासून 600 मीटर अंतरावर तीन अभियंते व दोन कर्मचारी यांना घेऊन जाणारे एक बोलेरो कॅम्पर (क्र. MH 33 T 3054) हे वाहन वरून येणाऱ्या व्हॅाल्वो ट्रकला जागा देण्यासाठी उभे होते. पावसामुळे खराब झालेल्या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी त्या व्हॅाल्वो ट्रकमधून काही सामान उतरविले जात होते. दरम्यान, लोहदगड भरलेला एक व्हॅाल्वो ट्रक खाली येत होता. त्या ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने डाव्या बाजुचे पुढचे चाक फिरले. त्यामुळे तोल जाऊन तो ट्रक खालच्या बाजुने उभ्या असलेल्या बोलेरो कॅम्परवर कोसळला. हा अपघात पाहताच घटनास्थळापासून काही अंतरावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने वॉकीटॉकीवरून घटनेची माहिती कार्यालयाला दिली. लागलीच बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले आणि वाहनाखाली दबलेल्या कर्मचाऱ्यांना बाहेर काढून हेडरी येथील रुग्णालयात पाठविण्यात आले. त्यानंतर तेथून त्यांना अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आहे. मात्र यात तीन अभियंत्यांचा तिथे मृत्यू झाला. बोलेरोमधील उर्वरित दोन कर्मचारी व व्हॅाल्वो ट्रकचा चालक जखमी झाला असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.