अमृत भारतमधील 500 रेल्वे स्टेशनचे आज पंतप्रधानांच्या हस्ते ऑनलाईन भूमिपूजन

44

– वडसा (देसाईगंज) रेल्वे स्टेशनवर खा. अशोक नेते यांच्या उपस्थितीत होणार प्रत्यक्ष भूमिपूजन

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : 

अमृत भारत योजनेअंतर्गत देशातील 500 रेल्वे स्टेशनचा भूमिपूजन सोहळा आज, 6 ऑगस्ट रोजी सकाळी 9 ते 12 वाजेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. अमृत भारतमध्ये गडचिरोली – चिमूर लोकसभा क्षेत्रातील वडसा (देसाईगंज) व आमगाव या रेल्वे स्टेशनचा समावेश असून वडसा येथे खासदार अशोक नेते यांच्या उपस्थितीत प्रत्यक्ष भूमिपूजन सोहळा होणार आहे. या सोहळ्याला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन खा. नेते यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेतून केले आहे.

गडचिरोली जिल्ह्याला रेल्वेमार्गाने तेलंगणा आणि छत्तीसगडला जोडण्यासाठी आपले सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी या दोन्ही मार्गाच्या सर्व्हेक्षणाला रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली असल्याचे माहिती खासदार अशोक नेते यांनी दिली आहे. तसेच नागभिड, काम्पाटेंपा, चिमूर, वरोरा या नवीन रेल्वेमार्गाच्या सर्व्हेक्षणाला मंजुरी मिळाली असल्याची माहिती माहिती खासदार अशोक नेते यांनी पत्रपरिषदेत दिली.

जिल्ह्यातील वडसा आणि लोकसभा क्षेत्रातील गडचिरोली जिल्ह्यातील आमगाव या दोन रेल्वे स्थानकांचा समावेश अमृत भारत स्टेशन योजनेत करण्यात आला. त्याअंतर्गत या स्थानकांमध्ये विविध प्रकारच्या सोयीसुविधा निर्माण करून त्यांचा पुनर्विकास केला जाणार आहे. त्या कामाचा शुभारंभ रविवार, ६ ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. सकाळी ९ वाजतापासून वडसा रेल्वे स्थानकावर या कार्यक्रमाला सुरुवात होणार असून ११ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑनलाईन मार्गदर्शन करणार आहेत. एकाचवेळी राज्यातील ४४ आणि देशातील ५०० स्टेशनवर हा कार्यक्रम होणार असल्याचे खा. अशोक नेते यांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमाला जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले.

गडचिरोलीला छत्तीसगडसोबत जोडण्यासाठी गडचिरोली-धानोरा – भानुप्रतापपूर (छत्तीसगड) तसेच तेलंगणाला जोडण्यासाठी गडचिरोली-चामोर्शी-आष्टी-आलापल्ली-सिरोंचा-अदिलाबाद या नवीन रेल्वे लाईनच्या कामाचे सर्व्हेक्षण होणार असल्याचे खा.अशोक नेते यांनी यावेळी सांगितले.

पत्रकार परिषदेला भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, जिल्हा महामंत्री रविंद्र ओल्लालवार, महामंत्री गोविंद सारडा, आदिवासी आघाडीचे प्रदेश सचिव प्रकाश गेडाम, जिल्हा संपर्क प्रमुख सदानंद कुथे, ज्येष्ठ नेते रमेश भुरसे, सुधाकर येनगंधलवार, अनिल कुनघाडकर, स्वप्निल वरघंटे, संजय बारापात्रे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.