हत्तींनी नुकसान केलेल्या घरांना तत्काळ भरपाई द्या : आ. कृष्णाजी गजबे

65

– आ. गजबेंच्या मागणीची दखल ; नुकसान भरपाई मिळणार असल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आश्वासन

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, २ ऑगस्ट : आरमोरी विधानसभा क्षेत्रातील कुरखेडा तालुक्यात आलेल्या ३० ते ३५ रानटी हत्तीच्या कळपाने हाहाकार माजविला असून काल रात्रीच्या सुमारास आंबेझरी गावात या हत्तीच्या कळपाने हैदोस घालून गावातील राहत्या घरांचे अतोनात नुकसान केले आहे. त्यामुळे वन विभागाने सदर नुकसानीचा तातडीने सर्व्हे करून नुकसानग्रस्तांना निकषात असलेल्या ५ हजार रुपयांऐवजी जास्तीत जास्त नुकसान भरपाई तत्काळ देण्यात यावी, अशी मागणी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णाजी गजबे यांनी मुंबई येथे सुरू असलेल्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात पाँइंट ऑफ इन्फार्मेशनच्या माध्यमातून आज, २ ऑगस्ट रोजी शासनाकडे केली.

आ. गजबे यांच्या सदर मागणीची राज्याचे वनमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी तातडीने दखल घेऊन कुरखेडा तालुक्यात रानटी हत्तींनी नुकसान केलेल्या घरांना ५ हजार रुपयांऐवजी सर्व्हेक्षणाच्या आधारे नुकसानीची तीव्रता बघून ९५ हजार रुपयांपर्यंत महत्तम मदत करण्याचे निर्देश वनसंरक्षक गडचिरोली व उपवनसंरक्षक वनविभाग वडसा (देसाईगंज) यांना दिले. त्यामुळे आमदार कृष्णाजी गजबे यांच्या मागणीला यश आले असून हत्तींनी नुकसान केलेल्या घरांचा येत्या २ दिवसात मोबदला मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याबद्दल कुरखेडा तालुक्यातील नुकसानग्रस्तांकडून आ. गजबे व शासनाचे आभार व्यक्त करण्यात येत आहे.