– डॉ. किरसान यांनी जाणल्या सिरोंचा तालुक्यातील पूरग्रस्तांच्या समस्या
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली, २ ऑगस्ट : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस महासाचिव डॉ. नामदेव किरसान यांनी 31 जुलै आणि 1 ऑगस्ट रोजी सिरोंचा तालुक्यातील नगरम, चिंतम्पल्ली, सोमनपली, कोत्तूर या गावांना भेटी दिल्या व गावाकऱ्यांशी संवाद साधला. ही गावे गोदावरी नदीकाठावर असल्याने आणि विशेषतः मेडिगट्टा धरण तयार झाल्याने गतवर्षीपासून या गावांवर वारंवार पुराचे संकट येत असते. मागच्या वर्षी या गावांना महाभयंकर पुराचा सामना करावा लागला व तशीच परिस्थिती कधीही निर्माण होऊ शकते. त्यामुळे येथील लोकांना आपला जीव मुठीत घेऊन जगावा लागत असल्याने येथील लोकांनी आपले गावाजवळ सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन करून देण्यात यावे, अशी मागणी डॉ. किरसान यांच्याजवळ केली.
या मागणीला घेऊन डॉ. नामदेव किरसान यांनी सिरोंचाचे तहसीलदार जितेंद्र शिकतोडे यांच्या मार्फतीने सदर गावांचे सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन करून नळ, पाणी, स्वच्छतागृह, वीज इत्यादी सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, अशी मागणी शासनाकडे केली आहे. यावेळी त्यांच्यासोबत माजी आमदार पेंटारामजी तलांडी, जिल्हा उपाध्यक्ष शंकरराव सालोटकर, अनुसूचित जाती सेल अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, परिवहन सेल अध्यक्ष रुपेश टिकले, अल्पसंख्यांक सेल उपाध्यक्ष एम. ए. अली अहमद, माजी जि. प. सदस्य मनोहर सावकार यांच्यासह स्थानिक काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.