दिना धरणाच्या कालव्याची तत्काळ दुरुस्ती करा : डाॅ. नामदेव उसेंडी

61

– डाॅ. उसेंडी यांनी दिली रेगडी धरणाला भेट

विदर्भ  क्रांती न्यूज

गडचिरोली, 27 जुलै : जिल्हयातील एकमेव मोठे सिंचन प्रकल्प म्हणजे चामोर्शी तालुक्यातील रेगडी गावात बांधलेले कर्मवीर कन्नमवार दिना डॅम यांचे बांधकाम 1969 ते 1974 या पाच वर्षात पुर्ण झालेले असून याची सिंचन क्षमता 12 हजार हेक्टर एवढी आहे. या धरणाच्या कालव्याचे जाळे रेगडी ते चामोर्शी तालुक्यातील भेंडाळापर्यंत पसरलेले आहे. नुकतेच या रेगडी धरणाला भेट दिली. या प्रकल्पाचे कालवे अंदाजे 48 वर्षापुर्वी बांधलेले असल्याने ते जिर्ण अवस्थेत आहेत. त्यामुळे शेवटच्या टोकापर्यंत शेतक-यांना सिचंनासाठी पाण्याचा पुरवठा होत नाही. ब-याच ठिकाणी जागोजागी या कालव्याला छिद्र पडल्यामुळे पाणी विनाकारण वाहून जातो स्थानिक स्तरावर यंत्रणेमार्फत धातूरमातूर तात्पुर्ती दुरुस्ती केल्या जाते. परंतु ही दुरुस्ती पहिल्याच पाण्यात वाहून जात असल्याने त्याचा उपयोग होत नाही. त्याकरीता दिर्घकालीन उपाययोजना करण्याच्या दृष्टीने रेगडी ते टेलरिजलपर्यंत या कालव्याचे सिमेंट – काँक्रीटचे अस्तरीकरण करणे अत्यंत आवश्यक आहे. स्थानिक आमदार, खासदार यांचे या बाबीकडे दुर्लक्ष असून आतातरी ते या कामाचे नियोजन करुन पाठपुरावा करतील काय? असा प्रश्न उपस्थित होते. शासनाचे या स्थानिक आमदार, खासदारांवर अवलंबून न राहता सुमोटो (स्वयंम प्रेरणेने) या कालव्याच्या सिमेंट – काँक्रीट अस्तरीकरणासाठी नियोजन करावे व गडचिरोली सारख्या सिचंनरहित जिल्हयात सिंचन सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात, अशी मागणी माजी आमदार तथा अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काॅग्रेस डाॅ. नामदेव उसेंडी यांनी केली आहे.
यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रमोद भगत, जिल्हा कोषाध्यक्ष प्रभाकर वासेकर, ग्रा. प. घोटचे माजी सरपंच बाळाभाऊ यनगंटीवार, माजी सदस्य सुशील शहा, नाजुक वाळके, माजी सरपंच बाजीराव गावडे, प्रकाश शहा, संजय गावडे, दत्तात्रय करंगामी उपस्थित होते.