माजी कॅबिनेट मंत्री आ. विजय वडेट्टीवार यांच्या सहकार्यातून महिला काँग्रेसतर्फे पूरग्रस्तांना मदतीचा हात

53

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली तालुक्यातील राजोली गावाला पुराणे वेढलेलं असताना नागरिकांची अन्न धान्याची नासधूस बघता माजी कॅबिनेट मंत्री आ. विजय वडेट्टीवार यांनी राजोली येथील कुटुंबियांना आधार दिला.

गडचिरोली जिल्ह्यात कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्हाभरात जलमय होऊन पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. जिल्ह्याचा सर्व भागात मुसळधार पाऊस कोसळलयाने अनेक नदी, नाल्याना पूर आला होता. या पुरामुळे जिल्ह्यातील अनेक गावांचा तालुका जिल्हा ठिकाणाशी संपर्क तुटला. अशातच गडचिरोली तालुक्यात येत असलेल्या राजोली (पोटेगाव) या गावी जोराच्या मुसळधार पाऊस आल्याने नजीकच्या पोरनदीची पाण्याची पातळी वाढत गेली व जिकडे तिकडे जलमय होऊन राजोली या गावी पाणी शिरून घरे, शेती, जनावरे व इतर जीवनावश्यक वस्तूंचे नुकसान झाले आहे.

यासाठी म्हणून महाराष्ट्र राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री आ. विजय वडेट्टीवार, महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. नामदेव उसेंडी, जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा ॲड. कविता मोहरकर व गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी यांचा पुढाकाराने गरजूंना उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून गरजूंना मदतीचा हात दिला. राजोली येथील पूरपीडितांना अन्न धान्याचे किट वाटप करताना महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी व गडचिरोली जिल्हा महीला काँग्रेसच्या अध्यक्षा ॲड. कविता मोहरकर यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.

यावेळी काँग्रेसचे जेष्ठ नेते प्रभाकर वासेकर, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सहसचिव कुणाल पेंदोरकर, जिल्हा महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षा कल्पना नंदेश्वर, राजोलीच्या सरपंचा कांता हलामी, उपसरपंच कन्नाके, ग्रामसभाचे शिवाजी नरोटे, प्रदीप बांबोळे, संजय गावडे, करिश्मा भैसारे, दत्ता करंगामी व खुप मोठ्या संख्येने गावकरी व महिला भगिनी उपस्थित होत्या.