कारवाफा येथे पहिली बीटस्तरीय शिक्षण परिषद

107

– फुलोरा व विद्यार्थी गुणवत्ता विकासावर विचारमंथन

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, 20 जुलै : कारवाफा व मेंढाटोला केंद्राच्या संयुक्त विद्यमाने बीटस्तरीय पहिली शिक्षण परिषद कारवाफा येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळेत बुधवार, १९ जुलै रोजी पार पडली. या परिषदेत फुलोरा, विद्यार्थी गुणवत्ता विकास, स्तर निश्चिती व निपुण भारत अध्ययन अभ्यास निष्पत्तीबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

शिक्षण परिषदेचे उद्घाटन कारवाफा व मेंढाटोला केंद्राच्या केंद्र प्रमुख संध्या मोंढे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारवाफा आश्रमशाळेचे माध्यमिक शिक्षक सुधीर शेंडे होते. प्रमुख अतिथी म्हणून कारवाफा जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका सरिता पोरेटी, मेंढाटोला शाळेच्या मुख्याध्यापिका अरुणा लांजेकर, जांभळीच्या मुख्याध्यापिका कल्याणी चौधरी, साखेराचे मुख्याध्यापक शरद बावणे, सुलभक देवेंद्र लांजेवार, फुलोरा समन्वयक मोरेश्वर अंबादे, गटसाधन केंद्राचे विषयतज्ञ किरण काळबांधे, महेंद्र भैसारे आदी उपस्थित होते.

क्रांतीसुर्य बिरसा मुंडा व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दिप प्रज्वलीत करुन शिक्षण परिषदेला सुरुवात झाली. अध्ययन व अध्यापन प्रभावी होण्यासाठी शिक्षकांनी अधिकाधिक कौशल्याचा वापर करावा. साहित्याचा वापर करून विद्यार्थ्यांना समजेल अशा सोप्या भाषेत विषयाची व्याप्ती विषद करावी, असे आवाहन यावेळी उपस्थित मान्यवरांनी केले.

पहिल्या शिक्षण परिषदेत केंद्र प्रमुख व सुलभकांनी फुलोरा, शैक्षणिक मूल्ये व विद्यार्थी गुणवत्ता विकास बाबत विशेष मार्गदर्शन केले. निपुण भारत अध्ययन अभ्यास सर्वेक्षण बाबत माहिती देऊन निपुण भारत कार्यक्रमावर विस्तृत चर्चा करण्यात आली. मराठी व गणित या विषयाच्या स्तर निश्चितीबाबत सादरीकरण तसेच मार्गदर्शन करण्यात आले. बालभवन रचना, प्रशासकीय बाबी, विद्या समिक्षा, विद्या प्रवेश, ५ सप्टेंबर २०२३ पर्यंत अंक व अक्षर मुक्त शाळा ध्येय पूर्ण करण्याबाबत आढावा, ,सेतू अभ्यास, जाली फानिक्स, न्यास अध्ययन निष्पत्ती, पाठ्यपुस्तकातील कोरे पान यांचा उपयोग कसा करावा याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. परिषदेत कारवाफा केंद्राचे ४३ तर मेंढाटोला केंद्राचे २९ अशा एकूण ७२ शिक्षकांनी समभाग घेतला. शिक्षण परिषदेच्या नियोजनानुसार तासिका घेऊन मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन शिक्षक जितेंद्र रायपुरे यांनी केले. शिक्षण परिषदेच्या यशस्वीतेसाठी दोन्ही केंद्राच्या शिक्षकांनी सहकार्य केले.