अविनाश भांडेकर यांचे पत्रकारितेतील कार्य कार्य गौरवास्पद

62

– पुणे येथील कृषी महाविद्यालयाच्या सभागृहात सत्कार, मराठी पत्रकार परिषदेचा उपक्रम

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, १८ जुलै : दुर्गम व मागास जिल्ह्यात राहून 33 वर्षे पत्रकारिता करणारे ज्येष्ठ पत्रकार अविनाश भांडेकर यांचे पत्रकारितेतील कार्य गौरवास्पद असल्यामुळे राज्य शासनाच्या अधिस्वीकृती समितीच्या सदस्यपदी नियुक्ती झाल्यानंतर मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख यांच्या हस्ते अविनाश भांडेकर यांचा सत्कार करण्यात आला.
पुणे येथील शासकीय कृषी महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित सत्कारप्रसंगी परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख, विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे, कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, राज्य सरचिटणीस मन्सुरभाई शेख, उपाध्यक्ष जान्हवी पाटील आदींची व्यासपीठावर उपस्थित होती.
अनेकदा पत्रकारांना मदतीची गरज भासते. अशावेळी प्रत्येकवेळी आपण पत्रकारांना मदत करू शकू, अशी परिस्थिती नसते. त्यामुळे आता पत्रकारांनी स्वतःसाठी काही तरी करण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यानुसार आता लवकरच गरजवंत पत्रकारांसाठी पत्रकारांकडून मदत निधी उभारण्याचा अनोखा उपक्रम ८५ वर्षांची परंपरा असलेल्या मराठी पत्रकार परिषदेच्या मार्फत हाती घेण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून पत्रकारांसाठी एक कोटींचा निधी उभारणार आहे. प्रत्येक पत्रकाराला एक हजार रुपये निधी देऊन या योजनेत सहभागी होता यावे, यादृष्टीने तिचे नियोजन करण्यात आले आहे. आगामी काळात पत्रकार हल्लाविरोधी कृती समिती अधिक सक्षम करण्याची गरज आहे, असेही देशमुख म्हणाले.
विश्वस्त किरण नाईक म्हणाले, पत्रकारांनी संघटीत झाल्यानंतर त्यांची ताकद खूपच मोठी असते, हे नेहमी दिसून आले आहे. तुम्ही संघटीत राहा, आम्ही २४ तास तुमच्या सोबत आहोत. तुमच्या मदतीसाठी पुढाकार घेऊ, अशी ग्वाही नाईक यांनी दिली.
प्रास्ताविक करताना अध्यक्ष शरद पाबळे यांनी सांगितले की, अधिस्विकृती समितीमध्ये सर्वात जास्त नावे मराठी पत्रकार परिषदेची आहेत, ही अभिमानाची बाब आहे. राज्यात सर्वात मोठे नेटवर्क परिषदेचे आहे, हे यानिमित्ताने स्पष्ट होत आहे. याप्रसंगी राज्य सरकारच्या अधिस्विकृती समितीवर नियुक्त झालेल्या मराठी पत्रकार परिषदेच्या १६ सदस्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाला राज्यातील अनेक पदाधिकारी उपस्थित होते.