अपयशाने खचून न जाता विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने पुढे जावे : योगीताताई पिपरे

42

– संताजी सोशल मंडळाच्या वतीने तेली समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, 9 जुलै : विद्यार्थ्यांनी आपल्या शैक्षणिक जीवनात जिद्द, चिकाटीने परिश्रम घेऊन यश प्राप्त करावे. विद्यार्थ्यांना ज्या क्षेत्रात करिअर करायचं आहे किंवा ज्या विषयाची आवड आहे त्याचेच शिक्षण घ्यावे व पालकांनी सुध्दा त्यांच्यावर डॉक्टर, इंजिनिअरच झाले पाहिजे म्हणून दबाव टाकू नये व मुलांच्या इच्छेनुसार शिक्षण देण्यास प्रोत्साहन द्यावे. विद्यार्थ्यांनी एखाद्या परीक्षेत अपयश आले म्हणून खचून न जाता जिद्द, चिकाटीने व आत्मविश्वासाने परिश्रम घेऊन आगामी जीवनात यश प्राप्त करावे. तेली समाजातील विद्यार्थ्यांनी आतापासूनच स्पर्धा परीक्षाची तयारी करून पुढील शैक्षणिक जीवनात यशस्वी व्हावे, असे आवाहन गडचिरोली शहराच्या माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे यांनी केले. संताजी सोशल मंडळाच्या वतीने आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.

संताजी सोशल मंडळ गडचिरोलीच्या वतीने 9 जुलै रोजी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात तेली समाजातील 10 वी, 12 वी तसेच एमपीएससी, युपीएससी व पी. एचडी, एमबीबीएस तथा नवोदय स्कालरशिप उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संताजी सोशल मंडळाचे अध्यक्ष प्रा. देवानंद कामडी होते तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून विद्यार्थी तेली समाज महासंघ नागपूरचे विद्यार्थी युवा नेते उमेशजी कोराम उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून दै. पुण्यनगरीचे जिल्हा प्रतिनिधी अविनाशजी भांडेकर, मंडळाचे सचिव गोपीनाथजी चांदेवार, विदर्भ प्रांतिक तैलिक महासभेचे जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवक प्रमोदजी पिपरे, गडचिरोली शहराच्या माजी नगराध्यक्ष सौ. योगीताताई पिपरे, मंडळाचे उपाध्यक्ष ऍड. रामदास कुणघाडकर, कार्याध्यक्ष रामराज करकाडे, कोषाध्यक्ष राजेश इटनकर, प्रभाकरराव वासेकर, सुरेश भांडेकर, महादेव वाघे, सुधाकर दुधबावरे, सुधाकर लाकडे, हेमंत खोब्रागडे, विठ्ठलराव कोठारे, विष्णुजी कांबळे, शंकरराव कोठारे, भाऊराव मुडके उपस्थित होते.

याप्रसंगी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते 10 वी, 12 वी व इतर गुणवंत विद्यार्थ्यांचा शिल्ड, प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे सचिव गोपीनाथ चांदेवार यांनी तर संचालन रामराज करकाडे यांनी केले. आभार सुधाकर लाकडे यांनी मानले. कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.