विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अतुल गण्यारपवार यांच्यासहीत तीन जणांच्या नामनिर्देशन पत्राबाबत जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी व जिल्हा निबंधकाने दिलेला निर्णय रद्द ठरवित विभागीय सहसहनिबंधकाने चार जणांचे नामनिर्देशनपत्र रद्द करण्याचा आदेश निर्गमित केला आहे. या आदेशाने चामोर्शी शहरात व राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
चामोर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत अतुल गण्यारपवार यांच्यासह तीन उमेदवारांच्या नामनिर्देशन पत्रावर सूचक म्हणून स्वाक्षरी केलेल्यांनी एकापेक्षा जास्त नामनिर्देशन पत्रावर स्वाक्षरी केली. या विरोधात आक्षेप अर्ज दाखल करण्यात आला. तरीदेखील निवडणूक निर्णय अधिकारी व जिल्हा निबंधकाने या आक्षेप अर्जावर निर्णय देताना तरतुदींचे पालन न करता नामनिर्देशनपत्र कायम ठेवण्यात आले. या निर्णयाविरोधात विभागीय सहसहनिबंधकांकडे आक्षेप अर्ज दाखल केले असता त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी व जिल्हा निबंधकांचा पूर्वीचा निर्णय रद्दबादल ठरविल्याने सदर निवडणुकीत संचालक म्हणून निवडून आलेले अतुल गंगाधर गण्यारपवार, अभिजित अरुण बंडावार, सुधाकर पुंडलिक निखाडे, गोसाई सीताराम सातपुते यांचे संचालक पद धोक्यात आले आहे.