नोटा बदलवून देणाऱ्या दोघांना अटक ; 27 लाख रुपयांची रोकड जप्त

51

– गडचिरोली पोलीस दलाची कारवाई

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, ५ जुलै : भारत सरकारने घेतलेल्या निर्यानुसार ३० सप्टेबर २०२३ नंतर 2 हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद होणार आहेत. त्यामुळे नागरिक सध्या बँकेतून 2 हजार रुपयांच्या नोटा बदलवून घेत आहेत. दरम्यान, बेकायदेशीररित्या जमा केलेली रक्कम बदलवून घेण्यासाठी जाणाऱ्या दोन संशयित इसमांना पोलिसांनी आज, ५ जुलै रोजी अहेरी येथून अटक केली आहे. त्याच्यांकडून 27 लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे.

केंद्र सरकारने २ हजाराची नोट चलनातून बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर लोक ह्या नोटा बदलवून घेत आहेत. दरम्यान बेकायदेशीररित्या जमा केलेली रक्कम बदलवून घेण्यासाठी आज रोहित मंगू कोरसा (२४, रा.धोडूर, ता.एटापल्ली) व बिप्लव गितीश सिकदर (२४, रा.पानावर, जि.कांकेर, छत्तीसगड) हे दोघेजण मोटारसायकलने जात असताना अहेरी येथे पोलिसांनी नाकेबंदी करून त्यांची तपासणी केली असता त्यांच्याकडे २७ लाख ६२ हजार रुपये आढळून आले. त्यात १२ लाख १४ हजार रुपये किंमतीच्या २ हजारांच्या ६०७ नोटा, १६ लाख ३६ हजार रुपये किंमतीच्या ५०० च्या ३०७२ नोटा व १ हजार ४०० रुपये किंमतीच्या २०० च्या ७ नोटा आढळून आल्या. त्यांची अधिक विचारपूस केली असता ही रक्कम नक्षलवाद्यांनी बदलण्यासाठी दिली असल्याचे दोघांनीही सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली. या दोघांवर यूएपीए अ‍ॅक्टअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक निलोत्पल, अपर पोलीस अधिक्षक (अभियान) अनुज तारे, अपर पोलीस अधिक्षक (प्रशासन) कुमार चिंता, अपर पोलीस अधिक्षक (अहेरी) यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.