Home गडचिरोली तलाठी पदभरतीला तत्काळ स्थगिती देऊन ओबीसी समाजावर झालेला अन्याय दूर करा

तलाठी पदभरतीला तत्काळ स्थगिती देऊन ओबीसी समाजावर झालेला अन्याय दूर करा

105

– आमदार डॉ. देवरावजी होळी यांना राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे निवेदन

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, 28 जून 2023 : गडचिरोली जिल्ह्यामध्ये तलाठी संवर्गातील पदे भरताना २०१४ च्या राज्यपालांच्या अधिसूचनेनुसार १५८ पैकी पेसा क्षेत्रातून १५१ पदे भरण्याचा निर्णय जाहिरातीमध्ये प्रसिद्ध करण्यात आल्याने ओबीसी समाजाला एकही जागा देण्यात आली नाही. त्यामुळे ओबीसी समाजामध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला असून या पदभरती प्रक्रियेला तत्काळ स्थगिती देऊन २८ फेब्रुवारी २०२३ च्या शासन निर्णयानुसार तलाठी पद भरती प्रक्रिया राबवावी व ओबीसीवरील अन्याय दूर करावा, अशी मागणी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्याकडे निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.

याप्रसंगी निवेदन देताना राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रा. शेषरावजी येलेकर, कार्याध्यक्ष विनायकजी बांदुरकर, जिल्हा अध्यक्ष दादाजी चुधरी, जिल्हा संघटक सुरेशजी भांडेकर, भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष प्रणयजी खुणे, माजी उपसभापती विलासजी दशमुखे यांच्यासह ओबीसी महासंघाचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी निवेदकांची म्हणणे ऐकून घेत आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी या भरती प्रक्रियेला तातडीने स्थगिती देऊन २८ फेब्रुवारी २०२३ च्या शासन निर्णयानुसार पद भरतीची प्रक्रिया राबवावी याकरिता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महसूल मंत्री व वनमंत्री यांना तातडीने ईमेल द्वारे पत्र पाठविले. या भरती प्रक्रियेमध्ये ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही याकरिता आपण शासन स्तरावर पाठपुरावा करू, असे आश्वासन त्यांनी यावेळी निवेदकांना दिले.

error: Content is protected !!