भामरागड, अहेरी, मुलचेरा तालुक्यातील मनरेगाच्या कामांतील दोषी अधिकारी व कर्मचाऱ्यांना तत्काळ बरखास्त करा

52

– आमदार डॉ. देवरावजी होळी यांना योगाजी कुडवे यांचे निवेदन

– प्रशासनाने कारवाई न केल्यास ११ जुलैपासून जि. प. समोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, 26 जून 2023 : महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड, अहेरी व मुलचेरा या तीन तालुक्यातील करोडो रुपयांचे बोगस काम व काम न करता पैशाची उचल केल्यासंदर्भातील तक्रारीच्या अनुषंगाने मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली यांनी गठित केलेल्या समितीच्या अहवालामध्ये या तीन पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी आढळलेले आहेत. त्यामुळे या दोषी अधिकाऱ्यांवर तातडीने बडतर्फीची कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्ते योगाजी कुडवे यांनी आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्याकडे निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.

दिलेल्या निवेदनानुसार भामरागड पंचायत समितीतील गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, शाखा अभियंता, नरेगा तांत्रिक अधिकारी (टि. पी. ओ.)  तसेच बोटनफुंडी, ईरूपडूम्मे, मडवेली, मन्नेराजाराम, येचली, पल्ली या ६ ग्रामपंचायतीचे सचिव असे एकूण १० अधिकारी व कर्मचारी दोषी आढळलेले आहेत. अहेरी पंचायत समितीतील गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, शाखा अभियंता, नरेगा तांत्रिक अधिकारी (टि. पी. ओ.) तसेच मनोहर ग्रामपंचायतीचे सचिव असे एकूण ५ अधिकारी व कर्मचारी दोषी आढळलेले आहेत. मुलचेरा पंचायत समितीतील गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी, शाखा अभियंता, नरेगा तांत्रिक अधिकारी (टि. पी. ओ.) विवेकानंदपूर सुंदरनगर शांतीग्राम व येल्ला ग्रामपंचायतीचे सचिव असे एकूण ८ अधिकारी व कर्मचारी दोषी आढळलेले आहेत. त्यामुळे या सर्व दोषी अधिकाऱ्यांवर तातडीने बडतर्फीची कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्याकडे सामाजिक कार्यकर्ते योगाजी कुडवे यांनी केली असून या संदर्भात प्रशासनाने कारवाई न केल्यास जिल्हा परिषद गडचिरोलीच्या समोर ११ जुलैपासून ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.