राहुल गांधी सावरकर कधीच होऊ शकणार नाही : आमदार डॉ. देवरावजी होळी

36

– स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेचा चामोर्शी येथील वाळवंटी चौकात समारोप

– समारोपाला नागपूर येथील श्री सुनीलजी किटकरु प्रमुख वक्ते

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : ज्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लहानपणापासूनच आपलं आयुष्य देशासाठी समर्पित केले, देशावर जीव ओवाळणारे शेकडो क्रांतिकारक तयार केले त्या सावरकरांच्या पायाची धूळ होण्याची लायकी नसणाऱ्या लोकांनी त्यांच्यावर टीका करून त्यांचा अपमान करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांना सावरकरांच्या त्यागाची बलिदानाची कल्पना देखील नाही. ते फक्त गांधी या आडनावामुळे पुढे आले आहेत. त्यामुळे त्यांना स्वातंत्र्यवीर सावरकर हे कधीच कळू शकणार नाही, ते कधीच सावरकर होऊ शकणार नाही ते गांधीच राहणार, असे प्रतिपादन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी चामोर्शी येथील स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेच्या समारोपीय प्रसंगी चामोर्शी वासियांना मार्गदर्शन करताना केले.

यावेळी मंचावर नागपूर येथील प्रसिद्ध वक्ते पूर्व संघ प्रचारक श्री सुनीलजी किटकरू व संघाचे पदाधिकारी श्री कोमेरवार सर प्रामुख्याने उपस्थित होते. गडचिरोली विधानसभा क्षेत्रात निघालेल्या स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रेचा समारोप आज चामोर्शी येथे करण्यात आला.

या यात्रेमध्ये भाजपाचे जिल्हा महामंत्री प्रमोदजी पिपरे, किसान मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सभापती प्राध्यापक रमेशजी बारसागडे, तालुक्याचे अध्यक्ष दिलीपजी चलाख, युवा मोर्चाचे प्रदेश कार्यकारणी सदस्य स्वप्निलजी वरघंटे, नगरसेविका रोशनीताई वरघंटे, बंगाली आघाडी जिल्हा अध्यक्ष सुरेश शहा, तालुका महामंत्री साईनाथ बुरांडे, भोजराज भगत, विनोदजी गौरकर, माजी नगरसेवक प्रशांत येगोलपावार, युवा नेते प्रतीक मराठी, सरपंच श्री भास्कर भुरे, ज्येष्ठ नेते जयरामजी चलाख यांच्यासह सहप्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.

या गौरव यात्रेच्या समारोपाच्या प्रसंगी आदिवासी गोंडी नृत्य, बंगाली नृत्य, भजन मंडळी शहरातील मातृशक्ती प्रकर्षाने लक्ष वेधून घेताना दिसून आली. गौरव यात्रेला उपस्थित लोकांच्या संख्येने यापुढे सावरकरांचा अपमान सहन करणार नाही असा संदेश देत असल्याची प्रतिक्रिया आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी मार्गदर्शनाच्या प्रसंगी व्यक्त केली.