नागभीड जं. रेल्वेस्थानकावर गया – चेन्नई सुपरफास्ट एक्सप्रेसचा थांबा मंजूर

33

– ९ एप्रिलला रात्री शुभारंभ सोहळा, खासदार अशोकजी नेते दाखवणार हिरवी झेंडी

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : दक्षिण पुर्व मध्य रेल्वे अंतर्गत असलेल्या नागभीड जंक्शन रेल्वे स्टेशनवर पुन्हा एका नव्या सुपरफास्ट ट्रेनचा थांबा खासदार अशोकजी नेते यांच्या सातत्यपुर्ण प्रयत्नांमुळे मंजुर झाला असुन या मार्गावरुन धावणारी गया चेन्नई ही साप्ताहिक ट्रेन या रवीवार पासुन नागभीड ला थांबणार आहे.
९ एप्रिल रविवारला रात्री २३.३८ वाजता गडचिरोली चिमुर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोकजी नेते यांच्या हस्ते या ट्रेनला नागभीड जं. रेल्वेस्थानकावर शुभारंभ सोहळ्यात हिरवी झेंडी दाखविल्या जाणार आहे. यावेळी आमदार बंटीभाऊ भांगडिया, दपुम रेल्वेचे नागपुर मंडल प्रबंधक व अन्य अधिकारी उपस्थित राहणार आहेत. या साप्ताहिक गाडीमुळे जबलपुर , कटनी , सतना , सासाराम , चेन्नई , गया याठिकाणी जाण्याची थेट सुविधा प्राप्त होणार आहे.
दर रविवारी रात्री २३.३८ वा . १२३८९ गया चेन्नई तर दर मंगळवार ला रात्री १.११ वा. ( बुधवार ) १२३९० चेन्नई गया सुपरफास्ट ट्रेन नागभीड जंक्शन स्टेशनवर थांबणार आहे. या मार्गावरुन धावणाऱ्या सर्वच सुपरफास्ट ट्रेनचा थांबा या मार्गावरील महत्वपुर्ण नागभीड जंक्शन स्टेशनवर मंजुर व्हावा यासाठी खासदार अशोकभाऊ नेते यांच्या माध्यमातुन दपुम रेल्वेचे झेडआरयुसीसी सदस्य संजय गजपुरे यांनी सातत्याने पाठपुरावा सुरु ठेवला आहे. त्याची फलक्षृती हळुहळु प्राप्त होत आहे. याआधी बिलासपुर चेन्नई ट्रेनचा थांबा नागभीड येथे सुरु झालेला आहे. नागभीड करांची सर्वाधिक मागणी असलेल्या चांदाफोर्ट जबलपुर ट्रेनचा नागभीडला थांबा लवकरात लवकर खासदार अशोकभाऊ नेते यांच्या पाठपुराव्याने मिळेल अशी आशा व्यक्त केल्या जात आहे.
हा थांबा मंजुर केल्याबद्दल रेल्वेमंत्री नाम. अश्विनजी व रेल्वे राज्यमंत्री नाम. रावसाहेब दानवे व खासदार अशोकभाऊ नेते यांचे नागभीडकरांच्या वतीने संजय गजपुरे व व्यापारी संघाचे अध्यक्ष गुलजार धम्माणी यांनी आभार मानले आहे. ९ एप्रिल रविवारी ला रात्री होणाऱ्या गया चेन्नई या ट्रेनच्या नागभीड स्थानकावरील थांब्याच्या शुभारंभ सोहळ्याला प्रवाशी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याची विनंती रेल्वे प्रशासनाने केली आहे.