– भारतीय मजदूर संघ जिल्हा गडचिरोलीच्या पदाधिकाऱ्यांचे आमदार डॉ. देवरावजी होळी यांना निवेदन
– कामगारांना न्याय मिळवून देण्यासंदर्भात जिल्हाधिकारी व कामगार मंडळाच्या अधिकाऱ्यांची फोनवरून केली चर्चा
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयामधील बाह्यस्त्रोत सफाई कामगारांचे प्रलंबित वेतन, वायुनंदना पावर प्लांट कनेरी येथील सुरक्षा रक्षकांना कामगार मंडळाचे नोकरीचे नियम व तरतुदी लागू करणे, गडचिरोली जिल्हा रुग्णालय तथा ग्रामीण रुग्णालयातील सुरक्षा रक्षकांचे वेतन नियमित मिळावे, बंद पडलेल्या जेजाणी पल्स अँड पेपर मिल प्रायव्हेट लिमिटेड देसाईगंज (वडसा) येथे कार्यरत असलेल्या ७५ कामगारांचे थकीत वेतन देण्यात यावे यासारख्या समस्याग्रस्त कामगारांना आपण न्याय मिळवून द्यावे, अशी मागणी भारतीय मजदूर संघाच्या वतीने आमदार डॉ. देवरावजी होळी यांना निवेदनाच्या माध्यमातून केली.
यावेळी निवेदकांनी लक्षात आणून दिलेल्या समस्या संदर्भात आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी मा. जिल्हाधिकारी व कामगार मंडळाच्या संबंधित अधिकारी यांचेशी फोनवरून चर्चा केली. यावेळी त्यांनी कामगारांच्या समस्या दूर करण्यासाठी संबंधितांना निर्देश द्यावे अशी सूचना केली. कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण सातत्याने पाठपुरावा करू असे आश्वासन आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी निवेदकांना दिले.