अमिर्झा – मौशीखांब डांबरी रस्त्याची दुर्दशा

64

– आवागमन करताना नागरिकांना नाहक त्रास, प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली तालुक्यातील अमिर्झा – मौशीखांब या ५ किमी. अंतराच्या डांबरी रस्त्याची दुर्दशा झाली आहे. या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले असून डांबर उखळलेला आहे. त्यामुळे या मार्गाने आवागमन करताना नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मात्र याकडे शासन व प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने जनतेमध्ये नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
मागील अनेक दिवसांपासून अमिर्झा – मौशीखांब या डांबरी रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. या रस्त्याने जर का एखाद्या गर्भवती महिलेला वाहनाने रुग्णालयात पोहचवायचे झाल्यास रस्त्याच्या दुरावस्थेमुळे वाटेतच त्या महिलेची प्रसुती होते की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. या रस्त्यावरील डांबर उखळलेला असून मार्गात अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत. त्यामुळे आजारी रुग्णासह दुचाकी व चारचाकी वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या समस्येकडे आतातरी शासन, प्रशासन व संबंधित विभागाने गांभिर्याने लक्ष देऊन अमिर्झा – मौशीखांब रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी परिसरातील जनतेकडून होत आहे.