शेकापने जिल्ह्यातील विविध समस्या लावल्या मार्गी

64

– पत्रकार परिषदेत भाई रामदास जराते यांची माहिती

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : सामान्य माणसांसाठी शेतकरी कामगार पक्षाने गेल्या वर्षभरात फुटपाथ, रेती तस्करी, दवाखाना, सुरजागड लोह खाण, शेतकरी आत्महत्या, मेडीगट्टासह अनेक प्रश्नांवर रस्त्यावर आणि विधिमंडळात संघर्ष, पाठपुरावा करून यश मिळवले. जिल्ह्यात शेतकरी कामगार पक्षाकडे खासदार, आमदार, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य असे कोणत्याही प्रकारचे लोकप्रतिनिधीत्व नसतानाही सदर प्रश्नांवरील यशस्वीता ही केवळ जनसामान्यांचे भक्कम जनसर्थन शेतकरी कामगार पक्षाच्या पाठीशी असल्यानेच शक्य झाल्याची माहिती शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते यांनी येेेथे आयोजित पत्ररकार परिषदेत दिली.

शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने गेल्या वर्षभरात शहरातील संघर्षनगरासह अतिक्रमण धारकांना दिलासा देण्यासाठी पाठपुरावा केला. त्यामुळे घरटॅक्स लावण्याचे काम झाले आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या नावाने फुटपाथ धारकांची दुकाने हटविण्यात आली होती. शेकाप सातत्याने फुटपाथ धारकांसोबत राहून पुन्हा दुकाने लावण्यात आली आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयातील दोन वेळा उद्घाटन होवूनही बंद असलेला सर्व सोई सुविधांनी सुसज्ज अतिदक्षता विभाग सुरू करण्यास प्रशासनाला भाग पडले. हजारो शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळण्यासाठी बॅकांकडे पाठपुरावा करण्यात आला.

शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार भाई जयंत पाटील यांच्या प्रयत्नांमुळेच मागील चार वर्षांपासून सिरोंचा तालुक्यातील मेडिगट्टा धरणग्रस्तांचा प्रलंबित प्रश्नाच्या सोडवणुकीची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना करावी लागली. स्थानिकांच्या हक्कांवर गदा आणून सुरजागड लोह खाणीचे काम सुरू आहे. याबाबत सातत्याने संघर्ष सुरू आहे. या विनाशकारी खाणीऐवजी जंगलावर आधारित उद्योग उभे करून जिल्ह्यातील बेरोजगारांना रोजगार देण्यात येण्यासाठी आमदार भाई जयंत पाटील यांनी विधान परिषदेत मागणी केली आहे.

येणाऱ्या नव्या वर्षात मासेमारी सहकारी संस्थांचे बळकटीकरण, पिण्याच्या पाण्याची बारमाही सुविधा, वाघांच्या हल्ल्यांबाबत दिर्घकालीन उपाययोजना, जंगलावर आधारित उद्योग, पेसा क्षेत्रातील रेती तस्करी आणि दुष्काळग्रस्त शेतकरी, कष्टकरी, अन्यायग्रस्त कर्मचारी, कामगार जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी शेतकरी कामगार पक्ष सातत्याने प्रयत्नशील राहणार असल्याची माहिती शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा चिटणीस भाई रामदास जराते यांनी दिली.

पत्रकार परिषदेला शेतकरी कामगार पक्षाचे जिल्हा खजिनदार भाई शामसुंदर उराडे, जिल्हा सहचिटणीस संजय दुधबळे, जयश्री वेळदा, अशोक किरंगे, सरपंच सावित्री गेडाम, चंद्रकांत भोयर, तुकाराम गेडाम, कविता ठाकरे, हेमंत डोर्लीकर, कैलास शर्मा, विनोद मेश्राम, योगेश चापले, तितिक्षा डोईजड, देवीदास मडावी, देवराव शेंडे, मारोती आग्रे प्रामुख्याने उपस्थित होते.