– सिरोंचा येथील मेडीगट्टा प्रकल्प बाधित शेतकऱ्यांच्या उपोषण मंडपाला दिली भेट
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली, १६ डिसेंबर २०२२ : महाराष्ट्र व तेलंगाना राज्याच्या सीमेवर सिरोंचाजवळ असलेल्या मेडिगट्टा धरणामुळे शेतकऱ्यांना प्रचंड नुकसान सहन करावे लागत असल्याने या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपण विधानसभेमध्ये प्रश्न मांडून शासनाचे लक्ष वेधणार, असे प्रतिपादन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी सिरोंचा येथील मेडिगट्टा प्रकल्प बाधित शेतकऱ्यांच्या उपोषण मंडपाला भेटीदरम्यान केले.
यावेळी मेडिगट्टा प्रकल्प बाधित शेतकरी, आदिवासी आघाडीचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप कोरेत, भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेते दामोदरजी अरगेला, प्रणयजी खुणे, सतिश गंजीवार, मंचेर्लावार, संदीपजी राचर्लावार, भाजपा सिरोंचा तालुका अध्यक्ष यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, तसेच संबंधित विभागाचे अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी उपोषणाला बसलेल्या मेडिगट्टा प्रकल्प बाधित शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांच्या मागण्या काय आहेत, त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी काय उपाययोजना करता येतील याबाबतची माहिती जाणून घेतली. त्यानंतर त्यांनी याबाबत सिरोंचा तहसील कार्यालयामध्ये आढावा बैठकीचे आयोजन केले. या बैठकीमध्ये प्रकल्पग्रस्तांच्या समस्या त्या संदर्भात करण्यात आलेल्या उपाययोजना यांची माहिती घेतली. यावेळी त्यांनी या संदर्भात शासन स्तरावर पाठवण्यात आलेले प्रस्ताव याचा पाठपुरावा करून प्रकल्प बाधितांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करावे, असे निर्देश बैठकीला उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.
आपण मेडिकट्टा प्रकल्प बाधित शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी सिरोंचा येथे आलो असून यापुढे या शेतकऱ्यांच्या समस्यांचा पाठपुरावा आपण शासन दरबारी करू या संदर्भात शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी व समस्या सोडविण्यासाठी विधानसभेत आवाज उठवू, असे आश्वासन त्यांनी यावेळी प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना दिले.