ऑस्ट्रेलीयातील अन्न प्रक्रिया उद्योगातील संधीचा लाभ घ्यावा : स्वानंद कुलकर्णी

48

– थेट ऑस्ट्रेलियातून गडचिरोलीतील साधला शेतकऱ्यांशी संवाद

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, १३ डिसेंबर २०२२ : जिल्हा कृषि महोत्सव-२०२२ गडचिरोली या कार्यक्रमात उपस्थित शेतक-यांना आभासी पध्दतीने मार्गदर्शन करताना मार्गदर्शन करताना ऑस्ट्रेलियाच्या ब्रिसबेन येथील अन्न सुरक्षा लेखापाल स्वानंद कुलकर्णी यांनी नवउद्योजकांना ऑस्ट्रेलियातील अन्न प्रक्रिया उद्योगातील संधींचा लाभ घेण्याचे आवाहन केले. ऑस्ट्रेलियामध्ये व्यवसाय चालु करणे, ऑस्ट्रेलियातील शेती व भारतातील शेतीमधील फरक व ऑस्ट्रेलियातील शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात स्वयंचलनाचा वापर, संरक्षित शेती याविषयी माहिती दिली. डॉ. पं. दे. कृ. वि. नागपूर येथील वनस्पती रोगशास्त्र तज्ञ सहयोगी प्राध्यापक डॉ. पोटदुखे यांनी अझोला तंत्रज्ञानाचा शेतीमध्ये वापर करुन नत्रखतांचा वापर कमी करता येऊ शकते याविषयी मार्गदर्शन केले. रुची ग्रुप ऑफ कंपनीचे संचालक डॉ. भालचंद्र ठाकुर यांनी ड्रॅगन फ्रुट या नाविण्यपुर्ण फळ पिक लागवडीविषयी माहिती दिली. गडचिरोली जिल्ह्यातील जमिन व हवामान ड्रॅगन फ्रुट लागवडीस पोषक असुन सुरुवातीला कमी क्षेत्रावार प्रायोगिक तत्वावर लागवड करुन नंतरच मोठ्याप्रमाणात लागवड करावी असे सांगितले. तसेच ड्रॅगन फ्रुट फळपिकाचे रोपे फक्त शासनमान्य रोपवाटींकांमधुन घेण्याचे आव्हान केले. पशुधन विकास अधिकारी डॉ. यशवंत उमरदंड यांनी आधुनिक पध्दतीने शेळीपालनाविषयी शेतक-यांना मार्गदर्शन केले. शेळीपालनकरिता स्थानिक जातीवंत शेळ्यांचा उपयोग करावा, शेळी / बोकडांची निवड, आहार, रोग, लसीकरण वेळापत्रक, दैनंदीन घ्यावयाची काळजी इ. विषयी माहिती दिली. डॉ. पं. दे. कृ. वि. नागपूर येथील तेलबियाणे शास्त्रज्ञ डॉ. संदिप कांबळी यांनी मोहरी, जवस या तेलबियाणे पिकाच्या लागवडी विषयी, माहिती दिली.
१३ डिसेंबर २०२२ रोजी जिल्हा कृषि महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी मोठ्या संख्येने शेतकरी बंधु व भगिनींनी प्रदर्शनीला भेट देऊन कार्यक्रमाचा लाभ घेतला. तसेच कृषि प्रदर्शनामध्ये उपस्थित आत्मा, माविम व उमेद यांच्या गटांकडुन मोठ्या प्रमाणात मुल्यवर्धीत पदार्थ व शेतमाल यांची विक्री झाली. मोठ्या संख्येने शेतकरी बांधवांनी व गडचिरोलीतील नागरिकांनी कृषी प्रदर्शनीला भेट देऊन लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कृषी महोत्सव समिती गडचिरोलीचे अध्यक्ष यांनी केले.