८ लोकांचा बळी घेणाऱ्या टी – ६ वाघिणीने दिला ४ पिलांना जन्म

46

– राजगाटा चेक जंगलात लावलेल्या कॅमेऱ्यात चार पिलांसह वाघीण कॅमेराबद्ध

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, १० डिसेंबर २०२२ : मागील काही दिवसांपासून गडचिरोली तालुक्यात धुमाकूळ घालणाऱ्या व आतापर्यत ८ जणांचा बळी घेणाऱ्या टी ६ वाघिणीने ४ पिलांना जन्म दिला आहे. गडचिरोली तालुक्यातील राजगाटा चेक परिसरातील जंगलात वनविभागाने लावलेल्या कॅमेऱ्यात ही वाघीण आपल्या चार पिलांसह शुक्रवारी रात्रीच्या सुमारास टिपल्या गेली. त्याकरिता तिला जेरबंद करण्याची मोहीम काही कालावधीसाठी रोखण्यात आल्याची माहिती वन विभागाने दिली आहे.या वाघिणीने आतापर्यंत ८ जणांचा बळी घेतला आहे. काही महिन्यांपूर्वी जिल्ह्यातील सीटी १ वाघाला जेरबंद करण्यात वन विभागाला यश आले होते. त्यानंतर टी ६ वाघिणीला जेरबंद करण्यासाठी गडचिरोली वनविभागातील चातगाव वन परिक्षेत्रात पथक तैनात करण्यात आले. महिनाभरापासून हे पथक सदर वाघिणीला जेरबंद करण्याकरिता जोरात मोहीम राबविण्यात येत आहे. मात्र या पथकाला तिने हुलकावणीदेखील दिली. दरम्यान, राजगाटा चेक परिसरातील जंगलात वन विभागाने लावलेल्या कॅमेऱ्यात शुक्रवारच्या रात्री ही वाघीण आपल्या चार पिलांसह कैद झाली..त्यामुळे वन विभागाने तिला जेरबंद करण्याची मोहीम तात्पुरती थांबवली आहे. पिलांसह फिरणारी वाघीण खूप आक्रमक राहत असल्याने लगेच हल्ला करू शकते. करीता चातगाव वनपरिक्षेत्रातील नागरिकांनी सावधगिरी बाळगावी, असा इशारा वन विभागाने दिला आहे.