आदिवासी विकास विभागातील सर्व इमारती दोन वर्षात सुसज्ज करणार : मंत्री डॉ. विजयकुमार गावीत

73
– अनुसूचित जमाती जात पडताळणी समिती कार्यालयाचे भूमिपुजन व नवसंजीवनी बैठक संपन्न
विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली, ८ डिसेंबर २०२२ : राज्यासह गडचिरोली जिल्हयातील आदिवासी विकास विभागांतर्गत येणारी प्रलंबित कार्यालये, आश्रमशाळा तसेच वसतिगृहांचे बांधकाम, वीज जोडणी पाणीपुरवठा अद्यावत करून सुसज्ज इमारती केल्या जाणार आहेत, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ.विजयकुमार गावीत यांनी केले. ते अनुसूचित जमाती जात पडताळणी समिती कार्यालयाच्या भूमिपुजनावेळी बोलत होते. खोट्या जात प्रमाणपत्रांवर आळा घालण्यासाठी व गरजूंना वेळेत प्रमाणपत्र वितरीत करण्यासाठी देशातील एकमेव अशा आपल्या राज्यात या समितीची स्थापना करण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणात या कार्यालयात शासकीय दस्ताऐवज ठेवले जातात त्यामुळे याठिकाणी प्रशस्त कार्यालयाची नितांत गरज असल्याचे ते पुढे म्हणाले. त्याचबरोबर आदिवसी समुह सक्षम होण्यासाठी करीअर अकादमी, आदिवासी क्रीडा अकादमी सुरू करणार असल्याचे ते म्हणाले. या भुमिपूजन कार्यक्रमावेळी आमदार डॉ.देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे, अप्पर आयुक्त आदिवासी विकास विभाग नागपूर रविंद्र ठाकरे, प्रकल्प अधिकारी डॉ.मैनक घोष, अधीक्षक अभियंता आदिवासी विकास विभाग उज्ज्वल डाबे, कार्यकारी अभियंता वर्षा घुशे उपस्थित होते.

यावेळी एलआयसी चौकातील शासकीय जागेवरती अनुसूचित जमाती जात पडताळणी समिती कार्यालयाचे भूमिपुजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पार पडले. यावेळी बोलताना मंत्री गावीत म्हणाले, आदिवासी मुलांमधे कला व कौशल्य वाढविण्यासाठी आदिवासी आश्रमशाळांमधे आवांतर अभ्यासक्रम सुरू करणार आहे. त्यांना इतर ज्ञान देवून त्यांना नोकरी व व्यवसायात मदत होण्यासाठी कार्य येत्या काळात सुरू केले जाणार आहे. गडचिरोलीत मोठ्या प्रमाणात वनोपज आहेत त्यावर प्रक्रिया करण्यासाठी निधी देवू. दुर्गम भागात रस्ते तयार करून येत्या काळात एकही गाव टोला वंचित राहणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना मिळण्यासाठी रेशनकार्ड प्रत्येकाकडे हवे, त्यासाठी आधार कार्ड, रेशन कार्ड अपडेट करावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
प्रत्येक जिल्हयाच्या ठिकाणी आदिवासी घटकांना मदतीसाठी राज्यात लवकरच आदिवासी भवन बांधकामाची प्रक्रिया राबविण्यासाठी नियोजन केले जाणार आहे. तसेच आदिवासी समुहांनी जंगल वाचवून जंगलात आपल्या परिसरात अर्थिक सुबत्ता निर्माण होईल अशा चांगल्या वाणांच्या झाडांची, बांबूची लागवड करावी असे ते पुढे म्हणाले. यावेळी आमदार डॉ.देवराव होळी व आमदार कृष्णा गजबे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात नवसंजीवनी बाबत आढावा
मंत्री. विजयकुमार गावीत यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात नवसंजीवनी अंतर्गत येणाऱ्या गावांच्या कामांबाबत सविस्तर आढावा घेतला. यावेळी जल जीवन मीशन, कुपोषण, शाळा व अंगणवाडी, रस्ते तसेच वीज पुरवठा आदी विषयांवर त्यांनी सविस्तर स्थिती जाणून घेतली. तसेच विविध विभागांना कामांबाबत सूचना केल्या. यावेळी जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी कामाबाबत सादरीकरण केले.